वसई : वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर वसई-विरार भागात नवीन वाहतुकीच्या नियमांनुसार कारवाई करण्यास सुरुवात झाली आहे. २०२२ च्या सुरुवातीच्या तीन महिन्यांतच वाहतूक पोलिसांनी २६ हजार १७२ इतक्या वाहनचालकांविरोधात कारवाई केली आहे.
वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांना लगाम घालण्यासाठी आता वाहतुकीच्या दंडाच्या रकमेत वाढ करण्यात आली आहे. सुरुवातीला केवळ किरकोळ दंड आकारला जात होता. आता मात्र दंडाची रक्कम ही चार ते पाच पट इतकी करण्यात आली आहे. त्या स्वरूपात ई चलान यंत्रात बदल केला आहे. नियमांचे उल्लंघन होत असल्याने अपघात, वाहतूक कोंडी यासह इतर वाहतुकीच्या समस्या निर्माण होत असतात. यासाठी जे नियमांचे उल्लंघन करून वाहने चालवीत आहेत अशा वाहनचालकांना लगाम घालण्यासाठी वाहतूक विभागाची सातत्याने कारवाई सुरू असते. मागील तीन महिन्यांत वसई व विरार वाहतूक शाखेने मिळून
सीट बेल्ट न लावणे, विनाहेल्मेट, चुकीच्या लेनने गाडी चालविणे, सिग्नल तोडणे, बेकायदा प्रवासी वाहतूक, वाहने नो पार्किंग झोनमध्ये लावणे, वाहन चालविताना मोबाइलचा वापर करणे, विनापरवाना वाहन चालविणे अशा प्रकारे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या २६ हजार १७२ वाहनधारकांच्या विरोधात चलानद्वारे कारवाई केली आहे. यातून १ कोटी ४० लाख ९४ हजार ७०० रुपये इतका दंड आकारण्यात आला आहे. यापैकी १८ हजार ९०५ वाहनधारकांनी ९० लाख ४ हजार तीनशे इतका भरला आहे, तर अजूनही ७ हजार २६७ वाहनधारकांनी ५० लाख ९० हजार ४०० इतका दंड थकीत ठेवण्यात आला असल्याची माहिती वाहतूक विभागाने दिली आहे.
‘महाट्रॅफिक ॲप’ वापरण्याचे आवाहन
ई चलान प्रणाली कार्यान्वित झाल्यापासून ही कारवाई इलेक्ट्रॉनिक पद्धतीने सुरू केली आहे. ई चलान पद्धतीने कारवाई होत असल्याने दंड भरण्याची जबाबदारी वाहनचालकांवर आहे. काही जण कारवाई होऊनसुद्धा दंडाची रक्कम भरत नाहीत. यामुळे दंड हा थकीत राहत आहे. यासाठी वाहनधारकांनी महाट्रॅफिकॲप डाउनलोड करून आपल्या वाहनावर काही दंड असेल तर तो भरावा, असे आवाहन वरिष्ठ वाहतूक पोलीस निरीक्षक दादाराम कारंडे यांनी केले आहे.
रस्ता अपघात रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. याशिवाय जे वाहतुकीचे उल्लंघन करीत आहेत त्यांच्यावर नवीन कारवाई सुरू आहे. सर्व वाहनधारकांनी नियमांचे पालन करून वाहने चालवावी असे वारंवार सांगण्यात येत आहे. तरीसुद्धा जे नियमांचे उल्लंघन करतील त्यांच्यावर कारवाई सुरुच आहे.-दादाराम कारंडे, वाहतूक पोलीस निरीक्षक, वसई-विरार