भाईंदर :- काशिमीरा येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानालगत असलेल्या मांडवीपाडा आणि काजूपाडा भागात उभारण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामांवर अखेर महापालिकेने कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार येथील अनेक बांधकामे जमीनदोस्त करण्यात येत आहेत.
मिरा रोड येथील काशिमीरा परिसराचा मोठा भाग संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला लागून आहे. येथे अनेक आदिवासी पाडे आहेत. मात्र गेल्या काही वर्षांत वाढत्या शहरीकरणामुळे नागरी वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे शासन नियमांना डावलून अनधिकृत बांधकामे उभारणारे भूमाफिया फोफावले आहेत. परिणामी येथे खाजगी गाळे व दुकाने मोठ्या प्रमाणात उभी राहिली आहेत. प्रशासनाकडून अधूनमधून कारवाई केली जाते, मात्र ठोस उपाययोजना नसल्यामुळे अद्यापही यावर पूर्णपणे अंकुश बसलेला नाही.
दरम्यान, मागील दोन महिन्यांत शहरात निवडणुकीचे वातावरण होते. या काळात महापालिका प्रशासन निवडणूक कामात गुंतलेले असताना काशिमीरा येथील आदिवासी पाड्यांमध्ये पुन्हा अनधिकृत बांधकामे उभारण्यात आल्याच्या तक्रारी प्रशासनाला प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार निवडणुका संपताच अशा बांधकामांवर कारवाई करण्याचे सक्त आदेश महापालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा यांनी प्रभाग अधिकारी (प्रभाग क्रमांक ६) प्रियांका भोसले यांना दिले होते.
त्याअनुषंगाने प्रशासकीय फौजफाटा व पोलीस बंदोबस्तासह प्रशासनाने कारवाई सुरू केली आहे. आतापर्यंत उभारण्यात आलेले पत्र्याचे शेड आणि विटांचे पक्के बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले आहेत. येत्या काही दिवसांत ही कारवाई अधिक तीव्र करून संबंधित बांधकाम व्यावसायिकांवर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून देण्यात आली आहे.

