भाईंदर : भाईंदरच्या उत्तन येथील दोन अनधिकृत हॉटेल गुरुवारी पालिकेने जमिनदोस्त केली. शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून ही दोन्ही हॉटेल उभारण्यात आली होती.

उत्तन येथील सव्‍‌र्हे क्रमांक ३५० च्या शासकीय जागेवर मागील काही वर्षांत मोठय़ा प्रमाणावर अतिक्रमण करण्यात आले. बेकायदा हॉटेल्स व रिसॉर्ट उभारण्यात आली आहेत. येथील बेकायदा बांधकामांची कर आकारणी करत नळ जोडणीदेखील पालिकेकडून देण्यात आली आहे. पोलीस प्रशासनाने सराव करण्यासाठी येथील जागेची पाहणी केली असता अतिक्रमण करण्यात आल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले होते.

शासकीय जमिनीवर अतिक्रमण काढून ती मोकळी करण्यासाठी मंगळवारी महसूल व पालिका प्रशासनाकडून येथील बांधकामांवर कारवाई करण्यात येणार होती. परंतु पाऊस असल्याचे कारण सांगत वेळकाढूपणा केला जात असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. बुधवारी सकाळी महसूल विभागाचे अधिकारी बेकायदा बांधकाम तयार करण्यात आलेल्या रिसॉर्टवर कारवाई करण्यासाठी पोहोचले होते. दुपारनंतर मनपा उपायुक्त अजित मुठे यांच्या उपस्थितीत अतिक्रमण विभागाकडून शासकीय जमिनीवर तयार करण्यात ‘विधी’ व ‘साई कृपा’ या दोन रिसॉर्टवर कारवाई करण्यात आली.