वसई : वसई-विरार व मीरा-भाईंदर शहरात विविध ठिकाणी वाट्टेल तशी बेशिस्तपणे वाहने उभी करण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन वाहतूक कोंडी होते. त्यामुळेच आता रस्त्यात बेशिस्तपणे उभी केलेली वाहने उचलण्याचा इशारा वाहतूक पोलिसांनी दिला आहे.
मीरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये मोठय़ा प्रमाणात शहरीकरण होऊन बाजारपेठा ही वाढू लागल्या आहेत. याशिवाय वाहनांची संख्या वाढली आहे. त्यामुळे शहरातील विविध रस्त्यांवर वाहतूक कोंडी होते. बेकायदा वाहने उभी करण्याचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे रस्त्यावरुन वाहने जाण्यास आणि चालण्यास जागा राहात नाही. मेट्रो व वर्सोवा पुलाच्या कामामुळे रस्ते अरुंद होऊन चढणाच्या व वळणाच्या रस्त्यांवर अपघात होतात तसेच वाहने बंद पडतात. अशा वेळी ती वाहने हटवण्यासाठी अनेक अडचणी निर्माण होतात. त्यामुळे बेशिस्तपणे उभ्या केलेल्या वाहनांवर वाहतुक पोलीस कारवाई करणार आहेत. अशी वाहने उचलण्यासाठी ठेका पद्धतीने ११ विविध प्रकारच्या वाहनांचा करारनामा करण्यात आला आहे. या अवजड वाहने टोइंग करण्याकरिता दोन, चारचाकी वाहने टोइंग करण्याकरिता एक व दुचाकी मोटार वाहने टोइंग करण्याकरीता आठ अशा वाहनांचा समावेश आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर मोटार वाहन कायदा १९८८चे कलम १२७ प्रमाणे कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तसेच टोइंग केलेल्या वाहनांवर दंडही आकारला जाईल.



