गाव-पाडय़ांची हद्द निश्चित करण्यासाठी मोहीम

वसई : वसईत अनेक ठिकाणच्या गाव-पाडय़ांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना आपली हद्द किती आहे याची माहिती नसल्याने अडचणी निर्माण होतात, तर दुसरीकडे शासनाकडे त्याचा नकाशा व नोंदी सापडत नाहीत. यासाठी आता वसईच्या भागातील गाव-पाडय़ांत महसूल विभागाच्या भूमिअभिलेख विभागाकडून ड्रोनद्वारे हवाई सर्वेक्षणास सुरुवात करण्यात आली आहे.

वसईतील विविध ठिकाणच्या ग्रामीण भागांतील गाव-पाडय़ांतही मोठय़ा संख्येने नागरिक हे वर्षांनुवर्षे राहत आहेत, परंतु ते राहत असलेल्या गावाची व जागेची हद्द निश्चित नाही. गावठाणांची हद्द निश्चित नसल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होते. तर काही वेळा वादविवाद होतात. असे प्रकार टाळण्यासाठी महाराष्ट्र शासन ग्रामविकास व महसूलच्या भूमिअभिलेख विभागामार्फत अशा गाव-पाडय़ांचे सर्वेक्षण करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.

 वसई-विरार महापालिकेच्या हद्दीबाहेरील गाव-पाडय़ांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. वसई तालुक्यात गावठाणात असलेल्या १२१ गावांचा यात समावेश आहे, त्यापैकी ४५ गावे व ३२ पाडे अशा एकूण ७७  ठिकाणी हवाई सर्वेक्षण केले जाणार आहे. या हवाई सर्वेक्षणास नुकतीच सुरुवात झाली असून खानिवडे, चिमणे, भालिवली, हेदवडे, खार्डी, डोलीव या ठिकाणी ड्रोनच्या साहाय्याने हवाई सर्वेक्षण करण्यात आल्याची माहिती भूमिअभिलेख विभागाचे उपअधीक्षक अभियंता रणजित देशमुख यांनी दिली. टप्प्याटप्प्याने हे इतर ठिकाणच्या भागांतही हे सर्वेक्षण पूर्ण केले जाणार आहे. या सर्वेक्षणात प्रत्येक भूखंडाचे जीआयएस सर्वेक्षण करण्यात येत असून यात गावठाणांतील मिळकतीच्या हद्दी व गावातील रस्ते, नाले, ओढे, खुल्या जागा पांढऱ्या रंगाच्या चुन्याने चिन्हांकित करून त्यावर ड्रोन फिरवून भूभागाची माहिती ही डिजिटल स्वरूपात गोळा केली जात आहे.

त्यानंतर मालमत्तांचे जीआयएसआधारित रेखांकन व मूल्यांकन करून भूभागांचे नकाशे तयार करून त्यांना भूमापन क्रमांक देण्यात येणार आहे. त्यानंतर नियमानुसार अधिकार अभिलेख मिळकत पत्रिका व सनद तयार करून संबंधितांना वाटप करण्यात येईल, अशी माहिती भूमिअभिलेख विभागाकडून देण्यात आली आहे.

वसईच्या ग्रामीण भागातील गावठाणांचे सर्वेक्षण करण्यास सुरुवात झाली आहे. वसईतील ४५ गावे व ३२ पाडे यांचा यात समावेश आहे. ग्रामपंचायत, ग्रामस्थ यांच्याशी चर्चा करून टप्प्याटप्प्याने हे काम पूर्ण केले जात आहे. या सर्वेक्षणामुळे गावाची व सदर भूभागाची हद्द ही नकाशाद्वारे कळणार आहे.

– रणजित देशमुख, उपअधीक्षक अभियंता भूमिअभिलेख विभाग वसई