वसई : नायगाव पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या उड्डाणपुलावर लावलेल्या उंची मर्यादा वाहनांच्या धडकेत तुटल्या होत्या. त्यामुळे अवजड वाहनांची वर्दळ पुलावरून वाढल्याने वाहतूक कोंडीसह अपघाताचे प्रमाण वाढले होते. नागरिकांच्या तक्रारीनंतर अखेर एमएमआरडीएने उड्डाणपुलावर नव्याने उंची मर्यादा कमानी बसविण्यात आल्या आहे.

नायगाव पूर्व व पश्चिमेचा परिसर शहराला जोडण्यासाठी उड्डाण पूल तयार करण्यात आला आहे. या पुल सद्यस्थितीत केवळ हलक्या वाहनांच्या वाहतुकीसाठी असून अवजड वाहनांना या पुलावर बंदी घातली आहे. अवजड वाहने या पुलावरून जाऊ नये यासाठी पुलाच्या पूर्व व पश्चिम अशा दोन्ही बाजूने लोखंडी उंची मर्यादा कमानी बसविण्यात आल्या होत्या. मात्र या दोन्ही बाजूच्या उंची मर्यादा कमानी वाहनांच्या धडकेत तुटल्या होत्या. मात्र आठवडा भर त्या कमानी धोकादायक स्थितीत जागच्या जागी पडून असल्याने अपघाताचा धोका ही वाढला होता. याशिवाय सहजरीत्या आता पूर्व पश्चिम अशी अवजड वाहनांची वाहतूक होत होती. यामुळे पूर्व पश्चिम अशा दोन्ही भागात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत होती.

याबाबत सामाजिक कार्यकर्ते आशिष वर्तक यांनी ही एमएमआरडीए सोबत पाठपुरावा करून उंची मर्यादा कमानी लावण्यात याव्यात अशी मागणी केली होती. या उंची मर्यादा कमानीच्या संदर्भात दैनिक लोकसत्ताने २४ ऑक्टोबर २०२५ रोजी वृत्त प्रसारित करून ही बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली होती. अखेर एमएमआरडीएने तुटलेल्या ठिकाणी नव्याने उंची मर्यादा कमानी बसविण्यास सुरवात केली आहे. पश्चिमेच्या बाजूने काम पूर्ण झाले असून पूर्वेच्या भागातही लावल्या जाणार आहेत. विशेषतः आता बसविण्यात आलेल्या कमानीच्या ठिकाणी त्या लांबूनच दिसून याव्यात यासाठी त्यावर ब्लिंकर्स ही लावण्यात येत आहेत.