वसई: कोकण किनारपट्टी परिसरात वसलेल्या ईस्ट इंडियन समुदायाकडून साजरा केला जाणारा आगेरा हा सण वसईत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावर्षी प्रथमच वसईकरांनी संत मायकल चर्चपर्यंत भव्य मिरवणूक काढली. यावेळी शेतातील नवे पीक देवाला अर्पण करून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
मुंबई, वसई, उत्तन, ठाणे व रायगड या भागात दरवर्षी ईस्ट इंडियन समुदायाकडून ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या रविवारी आगेरा हा पारंपरिक सण साजरा केला जातो. ‘आगेरा’ हा शब्द लॅटिन भाषेतील ‘अगेर’ या शब्दापासून तयार झाला असून शेत किंवा जमीन असा त्याचा होतो. स्थानिक भाषेत या सणाला ‘कापणीचा सण’ असेही म्हटले जाते.
या दिवशी ईस्ट इंडियन शेतकरी ‘लुगरा’ हा पारंपरिक पेहराव परिधान करून आणि पारंपरिक संगीताच्या तालावर मिरवणूक काढतात. शेतातील पहिले पीक चर्चमध्ये अर्पण केल्यानंतर धर्मगुरूंकडून त्या पिकावर आशीर्वादाचा विधी केला जातो. त्यानंतर हे पवित्र धान्य समाजातील नागरिकांना वितरित केले जाते. आशीर्वादाची ही कणसे नागरिक आपल्या घराच्या मुख्य दारावर लावतात.
वसईतील माणिकपूर धर्मग्रामात १८९० सालापासून, म्हणजेच गेल्या १३५ वर्षांपासून आगेरा सण साजरा केला जात आहे. यंदा संत मायकल चर्चचे धर्मगुरू फादर असिस रॉड्रिग्ज यांच्या पुढाकाराने माणिकपूर परिसरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. धर्मगुरूंनी प्रतीकात्मक कापणी केल्यानंतर, कनोसा शाळेच्या प्रांगणातून संत मायकल चर्चपर्यंत मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर शेतकऱ्यांनी अर्पण केलेल्या पिकाचा आशीर्वाद विधी पार पडला व विशेष मिस्सा (प्रार्थना) साजरी करण्यात आली.
दरम्यान आगेरा सणाबाबत सांगताना फादर असिस रॉड्रिग्ज म्हणाले की, शेतात आलेले पहिले पिक देवाला अर्पण करायचे, त्यावर आशिर्वाद घ्यायचा व देवाचे आभार मानायचे ही सुंदर प्रथा आपल्या पूर्वजांनी घालून दिली आहे. आज माणिकपूर व परिसरातील बरीचशी शेती अस्तिवात नाही, त्याजागी घरे उभी राहिली आहेत. पण, आजच्या काळातही आगेराचा संदेश तितकाच महत्त्वाचा आहे. कारण आगेरा हा फक्त शेतकऱ्याचा सण नसून तो प्रत्येक कष्टकऱ्याचा सण आहे. आगेरा आपल्याला सांगतो की, आम्ही बी पेरली, आम्ही कष्ट केले, पण वाढ देवाने दिली. त्यामुळे हा सण फक्त सांस्कृतिक सण नसून अर्पण, कृतज्ञता व देवाच्या कृपेची कबुली आहे.
पारंपरिक सणातून सामाजिक उपक्रम
तर सणाबाबत माहिती देताना विल्सन कोलासो म्हणाले की, “५० ते ६० वर्षांपूर्वी सर्वांनी एकत्र येऊन ‘आगेरा फंड’ सुरू केला होता. वर्गणीतून जमा होणाऱ्या रकमेतून सणाचा खर्च भागवून उरलेला निधी चर्चसाठी वापरला जायचा. तसेच ‘बिशप डॉमिनिक अब्रिओ मेमोरियल मेडिकल फंडाची सुरुवातही याच फंडातून केली आणि आता या फंडाच्या माध्यमातून कर्करोगासह विविध आजारांनी ग्रस्त रुग्णांना मदत केली जाते.”
