वसई: नालासोपारा पूर्वेतील उड्डाणपुलाखाली वाढत्या वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त असताना आता या कोंडीचा फटका रुग्णवाहिकांनाही बसू लागला आहे. बुधवारी रात्री बेशिस्त पणे उभ्या करण्यात आलेल्या रिक्षांमुळे एक रुग्णवाहिका या कोंडीत अडकून पडली होती.
नालासोपारा पूर्वेतून मुंबई-अहमदाबाद महामार्ग आणि रेल्वे स्थानकाला जोडणारा उड्डाणपूल गेला आहे. दोन महत्त्वाच्या ठिकाणांना हा उड्डाणपूल जोडला गेला असल्यामुळे हलक्या तसेच अवजड वाहनांची या मार्गावरून मोठी वर्दळ असते. मात्र, वाहनांची वाढती संख्या आणि अपुरे वाहतूक नियोजन यामुळे हा उड्डाणपूल वाहतूक कोंडीचे केंद्र बनू लागला आहे. तर शाळकरी विद्यार्थी, मालाची ने-आण करणारी अवजड वाहने, तसेच नोकरदार वर्गाला या वाहतूक कोंडीमुळे मनस्ताप सहन करावा लागत आहे.
तर दुसरीकडे याच कोंडीचा फटका आता रुग्णवाहिकांनाही बसू लागला आहे. रिक्षा चालक हे पुलाखाली बेशिस्त पणे रिक्षा उभ्या करीत असतात. याच बेशिस्त पणामुळे बुधवारी रात्री रुग्णावाहिका या कोंडीत अडकून पडली होती. रुग्णवाहिकेचा सायरन वाजत असताना सुद्धा रिक्षा बाजूला होत नसल्याचे चित्र दिसून आले. त्यामुळे कोंडी अधिकच वाढली होती. सामाजिक कार्यकर्ते यश माने यांनी रस्त्याच्या मध्येच वाट अडवून उभ्या असलेल्या रिक्षाचालकांच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त केला. या रिक्षाचालकांना वाहतूक पोलीस किंवा प्रशासनाचा कोणताच धाक उरला नाही त्यामुळे अगदी बिनधास्त पणे अस्ताव्यस्त अवस्थेत रिक्षा उभ्या केल्या जात आहेत असे त्यांनी सांगितले.
यापूर्वी रुग्णवाहिका कोंडीत अडकल्यामुळे घडलेल्या घटना
चौथ्या माळ्यावरून पडल्यामुळे रियान शेख या दीड वर्षीय मुलाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. पण मुंबई अहमदाबाद महामार्गावरील ससूनवघर गावाजवळ रुग्णवाहिका अडकल्यामुळे चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती.
काही महिन्यांपूर्वी वाहतूककोंडीचा फटका बसल्याने पालघर तालुक्यातील छाया पुरव यांचाही रुग्णवाहिकेत मृत्यू झाला होता. पुरव यांना मुंबईला उपचारासाठी नेत असताना वसई ते घोडबंदर येथे असलेल्या वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकल्याने त्यांचा मृत्यू झाला होता.
