scorecardresearch

नालासोपाऱ्यातील वाहतूक कोंडीचा फटका रुग्णवाहिकेला ; पालिका आणि वाहतूक विभागाचे समस्येकडे दुर्लक्ष

नालासोपारा पूर्वेतील वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस अधिक जटिल बनू लागली आहे. मंगळवारी संध्याकाळी नालासोपारा उड्डाणपुलावरील वाहतूक कोंडीचा फटका रुग्णवाहिकेला बसला.

वसई: नालासोपारा पूर्वेतील वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस अधिक जटिल बनू लागली आहे. मंगळवारी संध्याकाळी नालासोपारा उड्डाणपुलावरील वाहतूक कोंडीचा फटका रुग्णवाहिकेला बसला.
नालासोपारा पूर्वेला रस्त्याच्या मध्येच उभी केलेली वाहने, रस्त्याच्या कडेला भरविण्यात येत असलेले बाजार यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. आपत्कालीन परिस्थितीत सेवा पुरविणारी वाहने त्यात अडकून पडताना दिसत आहेत.
नालासोपारा पूर्वेतील भागातून मुख्य रस्ता गेला आहे. वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आधीच अपुरे आणि अरुंद रस्ते, त्यातच संतोषभुवन, धानिवबाग, वालाईपाडा यासह इतर ठिकाणी मुख्य रस्त्यांवर फेरीवाल्यांचे अतिक्रमण, बेशिस्त रिक्षाचालक यामुळे या मार्गावर वाहतूक कोंडीची समस्या अधिक जटिल बनू लागली आहे. मात्र पालिका व वाहतूक विभागामार्फत कोणतीच कारवाई केली जात नाही. मध्यंतरी फेरीवाले हटवून रस्ते मोकळे करण्याचे आश्वासन पालिकेकडून देण्यात आले होते. मात्र अजूनही योग्य ती पावले उचलली जात नसल्याने समस्या कायम आहे.
मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास निर्माण झालेल्या वाहतूक कोंडीत एक ते दीड तास वाहने अडकून पडली होती. रुग्णाला घेऊन निघालेली रुग्णवाहिकाही या कोंडीत सापडली. याआधीसुद्धा अशा प्रकारच्या घटना घडल्याचे दिसून आले आहे. वाहतूक पोलीस आणि प्रशासनाने याची दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.

मराठीतील सर्व वसई विरार ( Vasaivirar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ambulance traffic jam nalasopara municipality transport department amy