वसई:- विरारच्या प्रसिध्द अमूल कंपनीत देखभाल दुरुस्तीचे काम सुरू असताना अमोनिया वायूची गळती झाली. यात पाच कामगार बाधित झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.मंगळवारी सकाळच्या सुमारास ही घटना घडली वेळीच परिस्थिती नियंत्रणात आल्याने पुढील अनर्थ टळला आहे.

सोमवारी तारापूरच्या रसायन कंपनीतील वायूगळतीची घटना ताजी असतानाच विरारमध्येही अशाच प्रकारची घटना घडली आहे. विरार पूर्वेच्या कण्हेर फाटा येथे प्रसिध्द अमूल या दूध कंपनीचा प्रकल्प आहे. दूधापासून विविध पदार्थ या कंपनीत तयार केले जातात. मंगळवारी कंपनीने प्रकल्पाच्या देखभाल दुरूस्तीचे काम हाती घेतले होते.

सकाळी साडेअकराच्या सुमारास अमोनिया गॅसची गळती झाली. त्यावेळी कंपनीत ७० हून अधिक कामगार होते. गॅस गळती झाल्याने एकच खळबळ उडाली. सुरक्षेचा उपाय म्हणून कर्मचार्‍यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. मात्र काही जणांना श्वसनाचा त्रास जाणवू लागला. वायूमुळे गुदरमरलेल्या ५ कामगारांना महामार्गावरील पेल्हार येथील गॅलेक्सी रुग्णालयात दाखल करण्यात आले. काही वेळाने गॅस गळती थांबविण्यात यश आले.

या घटनेची माहिती मिळताच मांडवी पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती मांडवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजीत आंधळे यांनी दिली आहे. ज्या यात पाच महिला बाधित झाल्या आहेत त्यांची प्रकृती सुद्धा स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

अमोनिया वायू गळती मध्ये बाधित

विरारच्या अमूल कंपनीत अमोनिया वायू गळतीमध्ये पाच महिला कर्मचारी बाधित झाल्या आहेत.

  • यात शुभांगी पवार (४०), रीना सिद्धार्थ बोकफोडे (३९)
  • अपूर्वा शिवाजी इंगळे( १९), सनम सलीम खान (२०)
  • अंकिता राजभर (१९) यांचा समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

यापूर्वीची घटना

२५ नोव्हेंबर २०२५ रोजी वसईत क्लोरीन विषारी वायू गळतीची घटना घडली होती. दिवाण मान येथील जल कुंभाजवळ अनेक वर्षांपासून दुर्लक्षित असणाऱ्या क्लोरीन वायूच्या सिलेंडर मधून गळती झाली. या विषारी वायू गळती दुर्घटनेत १९ जण बाधित झाले होते तर एकाचा मृत्यू झाला होता.