वसई: विरार पश्चिमेतील आगाशी कोल्हापूर रस्त्यालगत असणाऱ्या बाभळीच्या झाडांना अज्ञातांनी आग लावल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही आग लावण्यासाठी शीतकपाटातील घातक थर्माकॉल वापरला गेला असल्यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
विरार पश्चिमेला आगाशी कोल्हापूर परिसर आहे. हा परिसर टेंबी-कोल्हापूर ग्रामपंचायतीचा भाग आहे. तर आगाशी गावात फारसे नागरीकरण झाले नसल्यामुळे इथला हरित पट्टा अजूनही कायम आहे. पण, गेल्या दोन ते तीन दिवसात गावातील झाडांना आगी लावण्याच्या तसेच त्यांची अनधिकृत कत्तल करण्याच्या घटना समोर येत आहेत.
विरारमधील अर्नाळा येथील महात्मा गांधींच्या स्मारकाच्या आवारातील वड आणि पिंपळाच्या झाडांची अमानुष कत्तल केल्याची घटना ताजी असताना आगाशी कोल्हापूर रस्त्यालगत असणाऱ्या बाभळीच्या झाडांना अज्ञातांनी आग लावल्याची घटना समोर आली आहे.
विशेष म्हणजे ही आग लावताना शीतकपाटातील अतिधोकादायक थर्माकॉल वापरला गेला असल्याचे स्थानिकांनी सांगितले आहे. त्यामुळे याबाबत नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
बाभळीच्या झाडांमुळे पावसाळ्यात जमिनीची धूप थांबते, तसेच हा हरीत पट्टा असल्यामुळे पक्षी या झाडांवर घरटी बांधतात. तसेच बाभळीच्या झाडांना मोठे काटे असल्यामुळे साप किंवा घार, कावळा अशा मोठ्या पक्ष्यांपासून अंडी आणि पिलांचा बचाव होतो. त्यामुळे झाडांना अशाप्रकारे आग लावणे चुकीचे असल्याचे मत पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केले आहे.

