वसई: करोनाच्या संकटामुळे मागील दोन वर्षे प्राणी गणना रद्द करावी लागली होती. मात्र यंदा करोनाचे संकट निवळले असल्याने दोन वर्षांनंतर बुद्ध पौर्णिमेला वसईतील तुंगारेश्वर अभयारण्यात प्राणी गणना करण्यासाठी वनविभाग सज्ज झाला असून याची सर्व पूर्वतयारी करण्यात आली आहे.
वसईच्या पूर्वेतील भागात तुंगारेश्वर अभयारण्य आहे.
मुंबई अहमदाबाद महामार्गावर वर्सोवा ते मांडवीपर्यंत तुंगारेश्वर अभयारण्याची हद्द आहे. ८ हजारहून अधिक हेक्टर या वनपरिक्षेत्रात हे अभयारण्य पसरलेले आहे. यामध्ये विविध पशु-प्राण्यांचा वावर आहे. यामध्ये बिबटय़ा, तरस, रानडुक्कर, रानमांजर, भेकर, कोल्हा, ससे, घोरपड, लांडगे असे विविध वन्यप्राणी, तर पोपट, मोर, बगळा, घुबड, हळद्या, कोकिळा, पावशा, सर्प, गरुड, महाभृंगराज, श्यामा, जंगली पिंगळा, सुभग, पर्ण पक्षी अशा विविध प्रकारचे पशुपक्षी आहेत.
अभयारण्यामध्ये वाढलेल्या मानवी हस्तक्षेपाचा प्राण्यांच्या संख्येवर काही परिणाम झाला आहे का किंवा गेल्या वर्षभरात वन्यप्राण्यांच्या संख्येत वाढ झाली आहे की कमी झाली. तसेच नवीन कोणता प्राणी दाखल झाला आहे का, अशा प्रकारची माहिती मिळविण्यासाठी वनविभागातर्फे दरवर्षी बुद्ध पौर्णिमेच्या रात्री प्राणी गणना केली जाते. मागील दोन वर्षांपासून करोनाच्या संकटामुळे होऊ न शकलेली प्राणी गणना यावर्षी केली जाणार आहे. यंदा १६ मे रोजी ही प्राणी गणना होणार आहे. याच अनुषंगाने तुंगारेश्वर वन विभाग सज्ज झाला असून त्यानुसार त्याची पूर्वतयारी करण्यात आली आहे.
अभयारण्यात असलेल्या पाणवठय़ावर बसून वनकर्मचारी व प्राणीप्रेमी प्राण्यांच्या होणाऱ्या हालचाली टिपणार आहेत. यासाठी प्रत्येक पाणवठय़ाच्या ठिकाणी झाडावर टेहळणी करण्यासाठी मचाड ( माची ) तयार करण्यात आली असल्याचे तुंगारेश्वर वनपरिक्षेत्राचे अधिकारी संदीप चौरे यांनी सांगितले आहे. यासाठी आवश्यक असलेले जे काही नियोजन आहे तेही पूर्ण केले असल्याचे चौरे यांनी सांगितले आहे.
पारंपरिक पद्धतीने १६ मे रोजी बुद्ध पौर्णिमेला तुंगारेश्वर जंगलातील पाणवठय़ांवर रात्रभर पहारा ठेवून वनविभागाचे कर्मचारी आणि प्राणीप्रेमी पाणी पिण्यासाठी येणाऱ्या प्राण्यांची नोंद केली जाणार आहे. यातून मिळणाऱ्या माहितीच्या आधारे अभयारण्यातील वन्यप्राण्यांची आकडेवारी समोर येणार आहे.