वसई: मागील २६ दिवसांपासून वसई पूर्वेच्या कशिद- कोपर या गावांच्या जवळ मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून उभारण्यात येत असलेल्या जलकुंभाच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या १०० हून अधिक आंदोलनकर्त्यांना शुक्रवारी पोलिसांनी ताब्यात घेतले. सायंकाळी नोटिसा देऊन त्यांना सोडण्यात आले.
कशिद कोपर या दोन्ही गावांना लागून असलेल्या डोंगरावर जलकुंभ उभारणी करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून डोंगर उत्खनन सुरू आहे, परंतु या उत्खननामुळे डोंगर कोसळून दुर्घटना होण्याची भीती कशिद-कोपर गावातील ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. यामुळे जलकुंभ उभारणीला येथील ग्रामस्थांनी विरोध करुन काम थांबविले होते. तसेच या ठिकाणी बेमुदत साखळी उपोषण सुरू केले होते.
हा प्रकल्प एमएमआरडीएला २०२२ पर्यंत पूर्ण करावयाचा असल्याने त्यांनी पोलीस बंदोबस्तात आंदोलनकर्त्यांवर कारवाईला सुरुवात केली. शुक्रवारी सकाळपासून कशिद कोपर गावात पोलिसांचा मोठा ताफा दाखल झाला होता. यावेळी वसईतील पर्यावरण संवर्धन समितीचे समीर वर्तक यांच्यासह आंदोलन करणाऱ्या शंभराहून अधिक आंदोलनकर्त्यांना मांडवी पोलिसांनी ताब्यात घेतले होते.
हा जलकुंभ अन्य ठिकाणी हलविण्यात यावा अशी ठाम मागणी असून शासनातर्फे कायदेशीर मार्गाने सुरू असलेले आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. या भागात पुन्हा कोणत्याही स्वरूपाचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी विविध ठिकाणी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे.