वसई:- विरार पश्चिमेकडील अर्नाळा समुद्रकिनाऱ्यावर गुरुवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास पर्यटनासाठी आलेले चार तरुण समुद्रात बुडाल्याची घटना घडली. नालासोपारा पश्चिमेकडील डांगेवाडी परिसरात राहणाऱ्या या चारही जणांना पाण्याचा आणि भरतीच्या लाटांचा अंदाज न आल्याने ते बुडू लागले होते. यावेळी किनाऱ्यावरील जीवरक्षकांनी तत्परता दाखवत यातील दोघांना सुखरूप बाहेर काढले, मात्र इतर दोन जण पाण्यात बेपत्ता झाले होते.
बेपत्ता झालेल्या तरुणांचा अर्नाळा सागरी पोलीस, अग्निशमन दल व तटरक्षक दलाच्या पथकाकडून शोध मोहीम राबवण्यात आली. या शोध मोहिमेत तटरक्षक दलाच्या हेलिकॉप्टरचीही मदत घेण्यात आली होती. गुरुवारी सायंकाळी ७ वाजेपर्यंत शोध घेऊनही हे तरुण सापडले नव्हते. त्यानंतर, शुक्रवारी सकाळी नऊच्या सुमारास अर्नाळा येथील एक मच्छिमार बांधव आपल्या बोटीतील पाणी काढण्यासाठी गेला असता, त्याला समुद्रात बुडालेल्या एका पर्यटकाचा मृतदेह आढळून आला. त्याने याची माहिती पोलिसांना दिली.
स्थानिक नागरिक व पोलिसांच्या मदतीने हा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. हा मृतदेह बेपत्ता झालेल्या अयान झाकीर हुसेन मंडळ ( १८) या तरुणाचा असल्याची ओळख पटली आहे. या घटनेतील शोएब शकील खान (१७) हा दुसरा तरुण अद्याप बेपत्ता असून, त्याचा शोध अजूनही सुरू असल्याची माहिती अर्नाळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश निकम यांनी दिली आहे.
