वसई: विरार पश्चिमेच्या अर्नाळा समुद्रकिनाऱ्यावर रविवारी दुपारी बाराच्या सुमारास एका अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आला आहे.या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, अर्नाळा पोलीस ठाण्याच्या पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आहे.

विरार पश्चिमेच्या भागात अर्नाळा समुद्र किनारा आहे. हा समुद्र किनारा पर्यटनासाठी प्रसिद्ध असल्याने मोठ्या संख्येने पर्यटक या समुद्रकिनाऱ्यावर येत असतात. तर येथील याच किनाऱ्यावरील जेट्टीच्या भागात मच्छीमार बांधवांची मोठ्या प्रमाणात रेलचेल असते. रविवारी अर्नाळा समुद्र किनाऱ्या लगतच्या भागात एका महिलेचा मृतदेह पाण्यात वाहून आल्याचे तेथील नागरिकांना दिसून आले. या घटनेची माहिती तेथील नागरिकांनी तातडीने अर्नाळा सागरी पोलिसांना दिली.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत अवस्थेत आढळून आलेली महिला ही २५ ते ३० वयोगटातील आहे.

​मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम सुरू असून, संबंधित महिला समुद्रात बुडाली की यामागे काही घातपात आहे, या दृष्टीने अर्नाळा पोलीस सर्व कोनातून अधिक तपास करत आहेत असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश निकम यांनी सांगितले आहे.