वसई: आपत्तीग्रस्त नागरिकांना शिधावाटप केंद्रावर मोफत धान्य वाटप केले जात आहे. मात्र, अर्नाळा गावातील धान्यवाटप केंद्र ४ किमी दूर असल्याने आपत्तग्रस्तांची गैरसोय होत आहे. त्यामुळे गावातील जवळच्या दोन नियमित राशन दुकानांद्वारेच धान्य वाटप करावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. जुलै महिन्याच्या सुरुवातीला पडलेल्या पावसामुळे वसई विरार शहरात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. पुराचे पाणी नागरिकांच्या घरात शिरून अन्नधान्य, संसारपयोगी वस्तू, विजेवर चालणारी उपकरणे यांचे पावसाच्या पाण्यामुळे नुकसान झाले होते. तर या नुकसानामुळे नागरिकांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला.
त्यामुळे आपत्तीग्रस्तांना जीवनावश्यक वस्तू उपलब्ध व्हाव्यात यासाठी शासन स्तरावरून धान्य वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला. यानुसार १० किलो तांदूळ आणि १० किलो गहू असे धान्य शिधावाटप केंद्रावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. मात्र, विरारमधील अर्नाळा येथे शिधावाटप केंद्राऐवजी गावापासून शेतकरी सोसायटीच्या माध्यमातून धान्यवाटप केले जात असल्याची माहिती ग्रामस्थांकडून देण्यात आली आहे.
यामुळे नागरिकांना सुमारे ४ किलोमीटर इतका प्रवास करून धान्य स्वीकारावे लागत आहे. याबाबत भाकपचे तालुका सेक्रेटरी वसई, काॅ. अनिरुद्ध मेहेर त्याने तहसील कार्यालयात निवेदन सादर केले आहे. यात अर्नाळा गावातील १४० लाभार्थ्यांपैकी बहुतांश नावे ही रोजंदारीवर पोट भरणाऱ्या आदिवासी रहिवाशांची आहेत. त्यांची आर्थिक मर्यादा आणि वाहतुकीचा खर्च पाहता शेतकरी सोसायटीपर्यंत जाऊन धान्य स्वीकारणे त्यांना अत्यंत कठीण आणि असुविधाजनक ठरणार असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. तसेच आपत्तीग्रस्तांच्या सोयीसाठी गावातील जवळच्या दोन नियमित राशन दुकानांद्वारेच धान्य वाटप करण्याची करावे, अशी मागणीही भाकपने केली आहे.
याबाबत वसईचे पुरवठा अधिकारी भागवत सोनार यांच्याशी संपर्क साधला असता, ग्रामस्थांच्या मागणीनुसार धान्यवाटप गावातील शिधावाटप केंद्रातून केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
