वसई: अरबी समुद्रात पालघर जिल्ह्याचा ऐतिहासिक ‘पहारेकरी’ म्हणून ओळखला जाणारा अर्नाळा किल्ला सध्या मद्यपी आणि असामाजिक तत्त्वांचा अड्डा बनल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.नुकताच ‘हिंदू धर्मरक्षक संस्थे’मार्फत राबवण्यात आलेल्या संवर्धन मोहिमेदरम्यान किल्ल्याच्या परिसरात हजारो दारूच्या बाटल्या आणि गांजा सेवनाचे पुरावे आढळल्याने दुर्गप्रेमींनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

अर्नाळा किल्ला हा पालघर जिल्ह्यातील विरारजवळच्या अरबीसमुद्रातील अर्नाळा बेटावर वसलेला हा प्रसिद्ध जलदुर्ग आहे.सोळाव्या शतकात पोर्तुगीजांनी हा किल्ला समुद्र मार्गातील व्यापार व संरक्षण यासाठी बांधला होता. हा किल्ल्याला ऐतिहासिक महत्त्व असल्याने पर्यटनाचे स्थळ म्हणून हा किल्ला प्रसिद्ध आहे. मात्र मागील काही वर्षात पुरातत्व विभागाने या किल्ल्याच्या देखभालीकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे या किल्ला परिसराची दयनीय अवस्था होत असल्याने चित्र दिसून येत आहे. किल्ल्याचे अस्तित्व टिकून राहावे यासाठी २६ एप्रिल रोजी ‘हिंदू धर्मरक्षक संस्थे’मार्फत स्वच्छता मोहीम राबविण्यात आली होती. या मोहिमे दरम्यान ४ एकर परिसरात स्वच्छता करण्यात आली.

यावेळी प्लास्टिक कचऱ्यासोबतच सिगारेटची पाकिटे, पानमसाल्याचे पाऊच आणि दारूच्या हजारो रिकाम्या बाटल्या विखुरलेल्या अवस्थेत आढळल्या. धक्कादायक बाब म्हणजे, किल्ल्याच्या ऐतिहासिक बुरुजांवरील ओतांड्यांमध्ये मद्यपींनी रिकाम्या बाटल्या मुद्दाम खुपसून ठेवल्याचेही दिसून आले. तसेच, किल्ल्याच्या अंधाऱ्या कोपऱ्यांमध्ये गांजा ओढण्यासाठी वापरले जाणारे साहित्यही मोठ्या प्रमाणात सापडले आहे. यासाठी किल्ल्यावर कायमस्वरूपी सुरक्षा रक्षक तैनात करणे, सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, मद्यपान करणाऱ्यावर कारवाई, नियमित स्वच्छता अशा विविध मागण्या दुर्गप्रेमींनी केल्या आहेत.

​पर्यटकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, सायंकाळनंतर या बेटावर मद्यपींचा वावर प्रचंड वाढतो. अंधाराचा फायदा घेत या ऐतिहासिक वारशाच्या ठिकाणी खुलेआम नशा केली जाते. यामुळे सहलीसाठी येणाऱ्या कौटुंबिक पर्यटकांना, विशेषतः महिलांना असुरक्षित वाटत असून किल्ल्याची प्रतिमा मलिन होत आहे.किल्ल्याच्या या दुरवस्थेला पुरातत्त्व विभाग आणि स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष कारणीभूत असल्याची टीका होत आहे. इतक्या मोठ्या ऐतिहासिक महत्त्वाच्या स्थळावर साधी सुरक्षा व्यवस्था नसल्याने असामाजिक घटकांना मोकळे रान मिळाले आहे असे दुर्गप्रेमीं प्रथमेश कदम यांनी सांगितले आहे.