प्रथमच विसर्जनासाठी कृत्रिम तलाव

पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याकडे नागरिकांचा कल हळूहळू वाढू लागला आहे.

तीन वर्षांनंतर वसई-विरार महापालिकेची संकल्पना प्रत्यक्षात

वसई : पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याकडे नागरिकांचा कल हळूहळू वाढू लागला आहे. याच पार्श्वभूमीवर पालिकेने शहरात विसर्जनासाठी कृत्रिम तलाव तयार करण्यासाठी सकारात्मकता दाखवली आहे. त्यामुळे शहरात गणेशमूर्ती विसर्जनासाठी विसर्जन स्थळाच्या शेजारीच  कृत्रिम तलाव उभारले जाणार आहेत.

करोनाच्या सावटामुळे सलग दुसऱ्या वर्षीही गणेशोत्सव हा साधेपणाने साजरा केला जाणार आहे. शासनानेही गणेश मूर्तीच्या उंचीची मर्यादा ठरवून दिली आहे.  तसेच विसर्जन स्थळी होणारी गर्दी टाळण्यासाठी विसर्जन मिरवणुकीलाही परवानगी नसल्याने साधेपणाने गणेशाचे विसर्जन केले जाणार आहे. त्यासाठी शहरात कृत्रिम तलावांची गरज निर्माण झालेली आहे.

दरवर्षी गणेशोत्सव काळात अनेक मूर्त्यांंचे विसर्जन हे तलावात किंवा समुद्रात केले जाते. दिवसेंदिवस मूर्तीची संख्या ही अधिक प्रमाणात वाढल्याने तलावातील पाणी हे प्रदूषित होते. तर कधी कधी पाण्यातील जैविक घटकांनाही याचा फटका बसतो.

या तलावातील प्रदूषण टाळण्यासाठी कृत्रिम तलावांची निर्मिती करून त्यात गणेशमूर्तीचे विसर्जन करावे, अशी संकल्पना काही वर्षांंपासून रुजू लागली आहे. यात संकल्पनेला धरून वसई-विरार शहरात पालिकेकडून मागील  दोन ते तीन वर्षांंपासून कृत्रिम तलाव ही संकल्पना राबविण्यावर भर दिला होता. मात्र पुरेशा प्रमाणात जनजागृती झाली नसल्याने ऐनवेळी ही योजना बारगळली होती.

यंदाच्या वर्षीही करोनाचे संकट कायम राहिल्याने गणेशोत्सव हा अगदी साधेपणाने साजरा होणार आहे. याच अनुषंगाने पालिकेने  नऊ प्रभागात असलेल्या विसर्जन स्थळी व  तलावांच्या शेजारीच कृत्रिम तलाव उभारण्यात येणार असल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संतोष देहेरकर यांनी दिली आहे. जर नागरिकांचा यंदा चांगला प्रतिसाद मिळाला तर पुढील वर्षी वाहनातच टँक बसवून कृत्रिम तलाव तयार करून ती वाहने शहरात ठरावीक ठिकाणी विसर्जनासाठी उभी केली जातील, असेही देहेरकर यांनी सांगितले आहे.

विसर्जनासाठी येणाऱ्या नागरिकांनी आपल्या गणेशमूर्ती या प्रत्यक्ष तलावात विसर्जित न करता कृत्रिम तलावात करतील यामुळे मुख्य तलावातील पाण्यातील प्रदूषण रोखण्यास मदत होऊ शकेल यासाठी नागरिकांनी तयार केलेल्या कृत्रिम तलावाचा वापर करावा, असे आवाहन पालिकेने केले आहे.

गणेशविसर्जनासाठी पालिकेच्या कार्यक्षेत्रात कृत्रिम तलाव तयार करण्यात येणार आहेत. सुरवातीला कृत्रिम तलाव हे ज्या ठिकाणी विसर्जनाचे तलाव आहेत अशा ठिकाणी उभारले जातील.

— संतोष देहेरकर, अतिरिक्त आयुक्त महापालिका

वरिष्ठांनी कृत्रिम तलाव करण्याच्या संदर्भात सूचना केल्या आहेत. त्यानुसार शहरात कृत्रिम तलाव तयार करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू केले आहेत.

— राजेंद्र लाड, कार्यकारी अभियंता महापालिका

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व वसई विरार बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Artificial pond for immersion for the first time vasai virar corporation ssh

ताज्या बातम्या