लोकसत्ता वार्ताहर भाईंदर : भाईंदर मध्ये पोलिसांवर उकळते पाणी टाकून प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या अजय चौबे (६०) या आरोपीचा ठाण्याच्या कारागृहात मृत्यू झाला आहे. या हल्ल्यात ५ पोलीस जखमी झाले होते. भाईंदरच्या गीता नगरमध्ये वालचंद प्लाझा या इमारतीत प्रतिभा तांबडे यांची एक सदनिका आहे. ती त्यांनी अजय चौबे याला भाडेतत्वार दिली होती. चौबे नियमित भाडे देत नव्हता तसेच मुदत संपल्यावर त्याने घरावर कब्जा केला होता आणि घरमालक महिलेला मारहाण केली होती. आणखी वाचा-पालघर जिल्ह्यात पंतप्रधान आवास योजना संथ, ६७ हजार लाभार्थी वंचित ३१ जुलै रोजी भाईंदर पोलिसांचे एक पथक या प्रकरणाचा पंचनामा करण्यासाठी चौबे यांच्या घरी गेले होते. मात्र चौबे दांपत्य आणि त्यांच्या मुलांनी पोलिसांवर उकळते पाणी, सिलेंडर तसेच लोखंडी सळीने हल्ला केला होता.यात सहाय्यक पोलीस निरीक्षक अनंत गायकवाड यांच्यासह हवलदार दीपक इथापे,किरण पवार, शिपाई रवी वाघ, शिपाई सलमान पटवे आणि पंच विजय सोनी जखमी झाले होते. त्यामुळे या प्रकरणी स्वतंत्र गुन्हा दाखल करून पोलिसांनी अजय चौबे, त्याचा मुलगा अभय आणि पत्नी अनिता यांना अटक केली होती. आणखी वाचा- वसईत आणखी एका महिलेचा बळी, मद्यधुंद टेम्पो चालकाने महिलेचा चिरडले त्यानुसार ७ ऑगस्ट पर्यंत पोलिस कोठडी पूर्ण झाल्यानंतर त्यांना ठाण्याच्या मध्यवर्ती कारागृहात आणण्यात आले होते. दरम्यान आज (१० ऑगस्ट रोजी )सकाळी अचानक अजय चौबे यांना श्वास घेण्याचा त्रास जाणवू लागला होता. त्यामुळे पोलिसांनी त्यांना ठाण्याच्या सिव्हिल रुग्णालयात दाखल केले होते. मात्र दुपारपर्यंत त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. हृदयविकाराच्या झटक्याने हा मृत्यू झाल्याचा अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे. मात्र अद्यापही शवविच्छेदन प्रक्रिया आणि इतर वैद्यकीय तपासणी केल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.