वसई : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पडलेले खड्डे आणि त्यामुळे होणाऱ्या अपघातांचा मुद्दा आता दिवसेंदिवस गंभीर बनू लागला आहे. मागील ५ वर्षांत या महामार्गावर सुमारे २ हजार अपघातांच्या घटना घडल्या असून त्यात ५११ जणांचा मृत्यू झाला आहे. सतत निवेदने देऊन, मागण्या करूनही सुधारणा होत नसल्यामुळे अखेर महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक, संबंधित अभियंते, रस्त्याचे बांधकाम आणि देखभाल दुरुस्ती ठेकेदार यांच्यावर अपघातांना जबाबदार ठरवून गुन्हे दाखल करण्याची मागणी खासदार राजेंद्र गावित यांनी पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षकांकडे केली आहे.

दहिसर चेक नाका सोडल्यानंतर मुंबई-अहमदाबाद महामार्गाची हद्द सुरू होते. ती गुजरात सीमेवर पालघर जिल्ह्यातील आच्छादपर्यंत आहे. हा महामार्ग एकूण ११९ किलोमीटर लांबीचा आहे. महामार्गावर झालेली अतिक्रमणे, सेवा रस्त्याचा अभाव, रस्त्याच्या मध्येच उभी केली जात असलेली वाहने, बंद पडलेली वाहने हटविण्यास यंत्रणेचा अभाव, मोकाट जनावरांचा वावर, चिखल व धुळीचे साम्राज्य, अपुरे दुभाजक अशा विविध प्रकारच्या कारणांमुळे अपघात घडत आहेत. सध्या पावसाळा सुरू असल्याने महामार्गावर विविध ठिकाणी मोठमोठे खड्डे तयार झाले आहेत. या खड्डय़ांमुळे अपघाताची संख्या अधिकच वाढली आहे. खड्डय़ांच्या दुरुस्तीकडे महामार्ग प्राधिकरण व त्यांनी देखभाल दुरुस्तीसाठी नेमणूक केलेली कंपनी यांच्या अनास्थेचा मोठा फटका नागरिकांना बसला आहे. महामार्ग प्राधिकरण खड्डे बुजविण्यात चालढकल करत असल्याने अपघात वाढत असल्याचा आरोप पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांनी मंगळवारी वसईत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केला. यावेळी त्यांनी मागील ५ वर्षांत झालेल्या अपघातांची आकडेवारी सादर केली. या हलगर्जीपणाबद्दल महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी आणि ठेकेदार यांच्यावर कलम ३०४(२), कलम ११८ अन्वये गुन्हे दाखल करण्याची मागणी करणारे निवेदन त्यांनी पोलीस आयुक्तांना सादर केले आहे. यानुसार महामार्ग प्राधिकरणाच्या तीन अधिकारी आणि ठेकेदारावर गुन्हे दाखल होतील असे त्यांनी सांगितले.

मागील पाच वर्षांत महामार्गावर झालेले अपघात

एकूण अपघात        जखमी               मृत

१ हजार ८२१           १ हजार ६५३             ५११

कलमे काय?

कलम ३०४-आपल्या निष्काळजी कृत्यांमुळे रस्त्यात वाहनांचा अपघात होऊन मृत्यू होऊ शकतो, हे माहीत असूनही खड्डे न बुजवणे. यासाठी १० वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद आहे.  कलम ११८ (अ)- मोटार वाहन कायदा अन्वये रस्त्यांचे बांधकाम, त्याची देखभाल करणारे कंत्राटदार, प्राधिकरण, सल्लागार यांच्या चुकीमुळे मृत्यू अथवा अपंगत्व आल्यास प्राधिकरण आणि कंत्राटदार यांना १ लाखापर्यंत दंड.