वसई: मुंबईला लागूनच असलेल्या नालासोपारा शहरात रिक्षाचालकांची मुजोरी दिवसेंदिवस अधिकच वाढू लागली आहे. नालासोपारा स्थानकाजवळील परिसरात दोन रिक्षाचालकांमध्ये भर रस्त्यात हाणामारी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून या प्रकाराबाबत नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

नालासोपारा रेल्वे स्थानकात वाढत्या गर्दीसह रिक्षा चालकांच्या संख्येतही मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. यामुळे स्थानक परिसरासह मुख्य रस्त्यावर रिक्षांच्या बेशिस्त रांगामुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होऊ लागली आहे. यामुळे रस्त्यावरून ये जा करणारे पादचारी तसेच वाहनचालकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे.

तर दुसरीकडे रिक्षा चालकांची वाढती दादागिरी आणि मनमानी मुळे भर रस्त्यात वादविवाद होण्याचे प्रकार समोर येत आहेत.
सध्या अशाच एका वादाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

नेमके प्रकरण काय ?

मिळालेल्या माहितीनुसार नालासोपारा पूर्वेच्या रेल्वे स्थानक परिसरात ही घटना घडली होती. दोन रिक्षाचालकांमध्ये किरकोळ कारणावरून वाद सुरू झाला होता. पाहता पाहता या वादांचे रूपांतर हाणामारीत झाले. दोन्ही रिक्षा चालकांनी वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून भर रस्त्यातच फ्री स्टाईल हाणामारी सुरू केली.

वाहतूक कोलमडली, प्रवाशांना मनस्ताप

दोन रिक्षा चालकांमध्ये झालेल्या हाणामारीमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे कामानिमित्त बाहेर पडलेल्या प्रवाशांचे हाल झाले. काही जण त्यात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करीत होते. परंतु मुजोर रिक्षाचालक कोणाचेही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते असे चित्र व्हिडीओत दिसून येत आहे. दोन्ही रिक्षाचालक एकमेकांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत आहेत. या प्रकारामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर ही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.