वसई : अंडर-१९ विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने दमदार कामगिरी केली आहे. भारताच्या संघाने अंडर-१९ विश्वचषक स्पर्धेत नालासोपाऱ्याच्या आयुष म्हात्रेच्या नेतृत्वात इंग्लंड संघाचा पराभव केला आहे.

झिम्बाब्वेतील हरारे स्पोर्ट्स क्लबच्या मैदानावर दोन्ही संघांमध्ये अंतिम सामना पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने पहिल्या डावात ४११ धावांचा डोंगर उभा केला. इंग्लाच्या संघानेही या धावांचा पाठलाग करत धावा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला पण १०० धावांनी अंतिम सामना भारतच्या संघाने आपल्या नावे केला असून सहाव्यांदा विजेतेपदाला गवसणी घातली आहे.

आयुष म्हात्रेच्या नेतृत्वात भारतीय संघाने केलेल्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. भारतातील नावाजलेले क्रिकेटपटू, नेतेमंडळ यांच्यासह सर्वच स्तरातून भारताच्या अंडर-१९ संघावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. भारताला हा विजय मिळवून देणारा आयुष म्हात्रे मूळचा नालासोपाऱ्याचा रहिवासी आहे. त्यामुळे काल सामना जिंकताच मोठ्या जल्लोषात त्याच्या कुटुंबियांनी हा आनंद साजरा केला.

वसईतील नागरिकांसाठी ही अभिमानाची गोष्ट तर आहेच. पण, अंडर-१९ विश्वचषक स्पर्धा आयुष्यात एकदाच खेळाडूंना खेळता येते. त्यानंतर टप्प्याटप्प्याने क्रिकेटरचे करिअर घडत जाते. त्यामुळे अंडर-१९ स्पर्धा ही लाईफ टाइम अचिव्हमेंट आहे. त्यामुळे या यशात आपला सहभाग असणं, आपण त्याचे नेतृत्व करणं, आणि ती ट्रॉफी आपल्या घरी घेऊन येणं, याच्यासारखी आनंदाची गोष्ट नाही. त्याच्या या यशात वसई, विरार आणि नालासोपाऱ्यातील अनेक व्यक्तींचा वाटा आहे, अशी प्रतिक्रियाही आयुष म्हात्रेचे वडील योगेश म्हात्रे यांनी दिली आहे.

तर आज (८ फेब्रुवारी) रोजी आयुष म्हात्रे आपल्या घरी परतला आहे. पण, नालासोपाऱ्यात पोहोचताच गाडीतून मिरवणूक काढत, फटाके आणि ढोल-ताशांच्या गजरात त्याचे जंगी स्वागत करण्यात आले. त्याला पाहण्यासाठी, भेटण्यासाठी, त्याची सही घेण्यासाठी शेकडो लोकांची गर्दी त्याच्या गाडीभोवती गोळा झाली होती.

आयुषचा आमदारांकडून सत्कार

Rajan Naik : आयुष म्हात्रे नालासोपाऱ्यात येताच, नालासोपाऱ्याचे आमदार राजन नाईक यांनी त्याची भेट घेत त्याचा सत्कार केला आहे. त्याने केलेल्या या अतुलनीय कामगिरीचे कौतुकही आमदार नाईक यांनी यावेळी केले.

असा झाला सामना

India vs England Final : भारतीय संघाने या नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सामन्याच्या सुरुवातीला शतकवीर आरोन जॉर्ज अवघ्या नऊ धावा करून माघारी परतल्यामुळे सुरुवातीला हा निर्णय फसल्यासारखे वाटले. पण त्यानंतर वैभव सूर्यवंशी आणि कर्णधार आयुष म्हात्रेने मिळून १४२ धावांची भागीदारी केली. या भागीदारीदरम्यान आयुष म्हात्रेने ५१ चेंडूत ५३ धावांची खेळी केली.

तर वैभव सूर्यवंशीने अवघ्या ८० चेंडूत १७५ धावांची खेळी केली. त्यानंतर वेदांत त्रिवेदी ३२ आणि विहान मल्होत्राने ३० धावांची खेळी केली. शेवटी अभिज्ञान कुंडूने ४० आणि कनिष्क चौहानने नाबाद ३७ धावांची खेळी करून संघाची धावसंख्या ९ गडी बाद ४११ धावांवर पोहोचवली.

इंग्लंडला हा सामना जिंकण्यासाठी ४१२ धावांचा डोंगर सर करायचा होता. सुरुवातीला सलामीवीर जोसेफ मुरेस अवघ्या १७ धावा करून माघारी परतला. त्यानंतर बेन डॉकिन्स आणि बेन मेयसने मिळून इंग्लंडचा डाव सांभाळला. डॉकिन्सने ६६ धावा केल्या. तर मेयसने ४५ धावा केल्या. पण हे दोघेही मोठी खेळी करू शकले नाहीत आणि या सामन्यात भारताच्या संघाने बाजी मारली.