दीड वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाकडे दुर्लक्ष
भाईंदर : मीरा-भाईंदर शहरातील सर्व पोलीस ठाण्यात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत, परंतु या कॅमेऱ्यांमध्ये ‘ऑडिओ रेकॉर्डिग’ ही यंत्रणा नसल्याचे उघडकीस आले आहे. सर्वोच्च न्यायालयाने २०२० रोजी दिलेल्या आदेशानुसार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये ऑडिओ रेकॉर्डिग यंत्रणा असणे बंधनकारक करण्यात आले आहे. तरीही त्याकडे दुर्लक्ष होत आहे.
मीरा-भाईंदर शहरात एकूण ६ पोलीस ठाणे आहे. दोन वर्षांपूर्वीच येथील पोलीस ठाण्याचा समावेश हा ठाणे ग्रामीण क्षेत्रातून वगळून मीरा भाईंदर वसई -विरार पोलीस आयुक्तालयाअंतर्गत करण्यात आला आहे. तेव्हापासून या पोलीस ठाण्यात विविध उपक्रम राबवले आहेत आहेत. यात महत्त्वाचे म्हणजे ‘एक कॅमेरा शहरासाठी’ या उपक्रमास नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. अशा परिस्थितीत याबाबत दुर्लक्ष होत आहे.
केंद्रीय व राज्य तपास यंत्रणेच्या कार्यालयात सीसीटीव्हीसह ऑडिओ रेकॉर्डिग यंत्रणा लावण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने डिसेंबर २०२० मध्ये दिले होते. सीसीटीव्ही व ऑडिओ रेकॉर्डिगमुळे तपास यंत्रणेकडे येणाऱ्या नागरिक, पीडित आणि आरोपींना सौजन्याची वागणूक मिळून अन्याय व गैरप्रकार कमी होतील अशी अशा होती. त्यानुसार मीरा-भाईंदर शहरातील सर्व पोलीस ठाण्यात हे सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत, परंतु यामध्ये ‘ऑडिओ रेकॉर्डिग’ यंत्रणा नाही.
यासंदर्भात माहिती अधिकार कार्यकर्ते यांनी पोलीस महासंचालकांना तक्रार केली होती. जून महिन्यात पोलीस ठाण्यात कॅमेऱ्यामध्ये ऑडिओ यंत्रणेचीदेखील सोय करून दिली जाणार असल्याचे आश्वासन लेखी स्वरूपात दिले होते. त्याला सहा महिन्यांचा कालावधी पूर्ण होत असतानादेखील कोणत्याही स्वरूपाचे पाऊल उचलले जात नसल्याचे आरोप कृष्णा गुप्ता यांनी केले आहेत.
कानाकोपऱ्यात सीसीटीव्ही हवेत
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशात पोलीस ठाण्यातील सर्व कानाकोपऱ्यात सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर असणे बंधनकारक करण्यात आले होते, परंतु तरीदेखील केवळ तक्रार नोंदणी विभाग आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षकांचे कार्यालय वगळता इतर ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्याची उभारणी करण्यात आलेली नाही. त्यामुळे अन्य पोलीस अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये गैरप्रकार प्रकार घडून येण्याची दाट शक्यता असल्याचे आरोप कृष्णा गुप्ता यांनी केले आहेत.
पोलीस ठाण्यात लावण्यात येणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ऑडिओ रेकॉर्डिग यंत्रणा बसवण्याचे काम राज्य शासनामार्फतच केले जात आहे. त्यानुसार मीरा भाईंदर शहरातील पोलीस ठाण्यातदेखील ते बसवण्यात आले असावेत. जर ते बसवण्यात आले नसतील तर त्याची सविस्तर माहिती घेतली जाईल.
– प्रकाश गायकवाड, – उपायुक्त, मुख्यालय, मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालय.