वसई: वसई-विरार शहराचे सौंदर्य वाढवण्यासाठी महानगरपालिकेने विविध चौकांचे सुशोभीकरण केले होते. या ठिकाणी आकर्षक शिल्पे, कारंजे आणि विद्युत रोषणाई बसवण्यात आली होती. परंतु, आता या चौकांकडे पालिकेचे आणि संबंधित ठेकेदारांचे दुर्लक्ष झाल्यामुळे त्यांची अवस्था बिकट बनली आहे, ज्यामुळे शहराचे सौंदर्य मावळत असल्याचे चित्र दिसत आहे.
गेल्या काही वर्षांपासून वसई विरार महापालिकेने शहराच्या सौंदर्यीकरणावर मोठा भर दिला होता. त्याचाच एक भाग म्हणून, पालिकेने शहरातील प्रमुख चौकांमध्ये विविध समाजाची ओळख दर्शवणारी शिल्पे उभारली, तसेच त्याभोवती सुंदर सजावट केली. मात्र, या कामांनंतर संबंधित ठेकेदार आणि पालिकेच्या प्रभागीय अधिकाऱ्यांनी या चौकांच्या देखभालीकडे दुर्लक्ष केल्याने त्यांची अवस्था बिकट बनली आहे.
वसई पूर्वेतील रेंज ऑफीस येथे चौकात असणारे कारंजे, तसेच वसई पश्चिमेतील अगरवाल परिसरात असणाऱ्या कारंज्यांची दुरावस्था झाली आहे. महापालिकेच्या दुर्लक्षामुळे एकेकाळी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेले हे कारंजे आज धूळखात पडले आहेत. कराज्यांमधील पाणी गढूळ झाले असून ते डासाच्या उत्पत्तीचे मूळ कारण ठरत आहेत. तसेच कारंज्यांच्या आसपास असणारे दिवे देखील बंद अवस्थेत आहेत. तसेच कारंज्यांवरील शिल्पांनाही तडे गेले आहेत. तर विरार मुख्यालया कडे जाणारा मनोरा ही कोसळून गेल्याचे चित्र दिसून येत आहे.
याचप्रमाणे, वसई पश्चिमेकडील बाभोळा नाका आणि पापडी येथे आगरी-कोळी बांधवांवर आधारित जी शिल्पे बसवण्यात आली होती, त्यांनाही आता तडे गेले आहेत. या सुशोभित चौकांना आता अनधिकृत जाहिरात आणि शुभेच्छा फलकांचाही विळखा पडला असून, त्यामुळे त्यांचे विद्रुपीकरण होत आहे.
या सर्व प्रकारामुळे पालिकेने कोट्यावधी रुपये खर्च करूनही या चौकांची योग्य निगा राखली जात नसल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पालिकेने तातडीने लक्ष देऊन हे चौक स्वच्छ करावेत आणि त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांमधून जोर धरत आहे.
पालिकेकडून दुरुस्ती
वसई विरार शहरात उभारण्यात आलेल्या चौकांची पाहणी केली जाणार आहे. ज्या ज्या ठिकाणी चौकांची दुरवस्था झाले असतील त्यांची दुरुस्ती केली जाणार आहे. देखभाल दुरुस्तीच्या संदर्भात निविदा ही काढल्या असून लवकर त्यांचे काम मार्गी लावले जाईल असे शहर अभियंता प्रदीप पाचंगे यांनी सांगितले आहे.
चौकांचा वापर जाहिरात बाजीसाठी
शहरातील सुशोभित केलेल्या चौकातच आता विविध ठिकाणी अनधिकृत पणे फलक लावण्याचे प्रकार सुरू झाले आहे. विशेषतः यात राजकीय पक्षाच्या फलकांचा समावेश आहे.
या वाढत्या अनधिकृत फलकांमुळे चौक विद्रुप दिसत आहेत. अशा जाहिरात बाजीला लगाम घालण्यात यावा.
शहर सौंदर्य करण्याच्या कामात गैरप्रकार
वसई विरार शहरात महापालिके मोठा गाजावाजा करून शहरात सौंदर्य शिल्प उभारले आहेत. यासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी खर्च केला आहे. या कामातही पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून गैरप्रकार झाल्याने अशा पद्धतीची अवस्था पहावयास मिळत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
