लोकसत्ता, विशेष प्रतिनिधी वसई : मुंबई विद्यापीठात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून वसईतील एका इसमाला तब्बल ५० लाखांचा गंडा घालण्यात आला आहे. या प्रकरणी वसई पोलिसांनी डोंबिवलीतील एका दांपत्यासह तिघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. यातील आरोपी याने मुंबई गुन्हे शाखेत पोलीस असल्याचे भासवून मैत्री केली होती. वसई राहणारे फिर्यादी जग्गनाथ दिंडेकर (५२) यांचा मासे खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे. २०२० मध्ये त्यांची ओळख डोंबवलीत राहणार्या अजय चौधरी याच्याशी झाली. मी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा १ मध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक असल्याचे चौधरी याने भासवले होते. तर त्याची पत्नी अदिती चौधरी हिने मुंबई विद्यापीठात उच्च पदावर असून शिक्षण मंत्र्यांशी ओळख असल्याची थाप मारली होती. फिर्यादी दिंडेकर यांचा मुलगा आणि पुतण्या या दोघांना मुंबई विद्यापीठात नोकरी लावण्याचे आमिष या दांपत्याने दाखवले. यासाठी त्यांच्याकडून तब्बल ५० लाख ६१ हजार रुपये उकळले होते. मात्र आरोपींनी नोकरी लावली नाही तसेच घेतलेले पैसेही परत केले नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर अखेर त्यांनी वसई पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी आरोपी अजय चौधरी, त्याची बहीण गीता आणि पत्नी अदीती चौधरी यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. आणखी वाचा-वसई पालिका उपायुक्त अजित मुठे यांना भूमाफियांची मारहाण तिन्ही आरोपी हे डोंबिवली येथे राहणारे आहेत. फिर्यांदी यांच्या कुटुंबियांशी ओळख होती आणि घरी ये-जा होती. मात्र त्यांनी पोलीस असल्याचे तसेच विद्यापीठात काम करत असल्याचे भासवून विश्वास संपादन केला होता. या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे, असे वसई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजीत आंधळे यांनी सांगितले.