वसई: ​केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या नियमानुसार ‘भारत मालिका’ म्हणजेच ‘बीएच’ सीरीज अंतर्गत नोंदणीकृत असलेल्या वाहनांचा थकीत रस्ते कर तातडीने जमा करण्याचे आवाहन वसई उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने केले आहे. दिलेल्या मुदतीत कराचा भरणा न करणाऱ्या वाहनधारकांवर लवकरच विशेष मोहिमेद्वारे दंडात्मक आणि कायदेशीर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा प्रादेशिक परिवहन अतुल आदे यांनी दिला आहे.

​केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने २०२१ मध्ये जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, सरकारी तसेच खासगी क्षेत्रातील बहुराज्यीय कर्मचाऱ्यांची एका राज्यातून दुसऱ्या राज्यात होणारी वारंवार स्थानांतरणे लक्षात घेऊन ‘बीएच’ सीरीज नोंदणी योजना सुरू करण्यात आली होती. या योजनेचा मुख्य उद्देश एकाच नोंदणी क्रमांकावर वाहनधारकांना कोणतीही अडचण न येता संपूर्ण देशभरात वाहन चालवण्याची मुभा देणे हा आहे. या विशेष व्यवस्थेअंतर्गत वाहनाचा रस्ते कर दर दोन वर्षांनी टप्प्याटप्प्याने भरणे बंधनकारक करण्यात आले आहे.

​वसई प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या हद्दीत आतापर्यंत सुमारे ९४७ ‘बीएच’ मालिका वाहनांची नोंदणी झाली आहे. नियमानुसार दोन वर्षांचा कर कालावधी समाप्त झाल्यानंतर संबंधित वाहनधारकांनी पुढील दोन वर्षांसाठी कराचा पुन्हा भरणा करणे आवश्यक असते. कर भरण्याची मुदत संपल्यानंतर सात दिवसांची सवलत दिली जाते; मात्र आठव्या दिवसापासून प्रतिदिवस १०० रुपये अतिरिक्त दंड आकारला जातो. वसई आरटीओच्या पाहणीत असे दिसून आले आहे की, अनेक वाहनधारकांची कर भरण्याची मुदत संपूनही ते कर भरण्याकडे दुर्लक्ष करत आहेत.

​या पार्श्वभूमीवर, वसई परिवहन विभागाने सर्व ‘बीएच’ मालिका वाहनधारकांना आपल्या वाहनाच्या कराची स्थिती तात्काळ तपासून घेण्याचे आवाहन केले आहे. ज्या वाहनधारकांचा कर थकीत आहे किंवा ज्यांची मुदत नजीकच्या काळात संपणार आहे, त्यांनी वेळेत कर भरून अतिरिक्त दंड आणि संभाव्य जप्तीसारख्या कायदेशीर कारवाईपासून बचाव करावा. आरटीओ प्रशासनाने थकीत कर वसुलीसाठी लवकरच वसई-विरार परिसरात विशेष तपासणी मोहीम राबवण्याचे नियोजन केले आहे अशी माहिती प्रादेशिक परिवहन विभागाने दिली आहे.