भाईंदर : भाईंदर येथील मेडतिया नगर परिसरात महापालिकेने उभारलेल्या अप्पासाहेब धर्माधिकारी सभागृहाच्या मुख्य प्रवेशद्वारावरील लोखंडी गेट धोकादायक अवस्थेत आला आहे.या गेटमुळे आठवड्याभरात दोन दुर्घटना घडल्या आहेत.यात महापालिकेचे विद्युत अभियंता प्रशांत जानकर गंभीर जखमी झाले आहेत.
दोन वर्षांपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या सभागृहाचे लोकार्पण करण्यात आले होते. सभागृहाच्या उभारणीसाठी महापालिकेने ५० कोटी रुपयांहून अधिक खर्च केला आहे. मात्र, कामाच्या गुणवत्तेबाबत वेळोवेळी तक्रारी होत असतानाच आता मुख्य प्रवेशद्वारावरील लोखंडी गेट मोडकळीस आल्याचे समोर आले आहे.२१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सभागृहात आयोजित कार्यक्रमासाठी येत असताना महापालिकेचे विद्युत अभियंता प्रशांत जानकर यांच्या पायावर हे लोखंडी गेट अचानक कोसळले. या अपघातात त्यांचा पाय मोडला असून त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. डॉक्टरांनी त्यांना पुढील काही महिने विशेष खबरदारी घेण्याचा सल्ला दिला आहे.
यापूर्वीही या ठिकाणी रांगोळी काढत बसलेल्या एका मुलावर हेच गेट कोसळला होता. मात्र, तो थोडक्यात बचावला. सभागृहात सातत्याने विविध शासकीय, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम होत असल्याने येथे मोठ्या संख्येने नागरिक आणि लहान मुले उपस्थित असतात. अशा परिस्थितीत हे गेट एखाद्या व्यक्तीवर कोसळल्यास गंभीर दुर्घटना होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
या पार्श्वभूमीवर सभागृहाच्या प्रवेशद्वारावरील गेटची तातडीने दुरुस्ती करून नागरिकांच्या सुरक्षिततेची खात्री करावी, अशी मागणी होत आहे. दरम्यान, संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक दुरुस्तीचे आदेश देण्यात आल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली.
