भाईंदर :- भाईंदरमध्ये उभारण्यात आलेल्या बाबासाहेब आंबेडकरांच्या कमानीला झाकून भाजप नेत्यांच्या फोटोसह बॅनर लावल्याने वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणी बॅनर लावणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनी पालिका मुख्यालयात ठिय्या आंदोलन केले.

भाईंदर पश्चिम येथील झोपडपट्टी परिसराला आंबेडकर नगर असे नाव देण्यात आले आहे. त्यामुळे या परिसराच्या मुख्य प्रवेशद्वारावर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाची कमान उभारण्यात आली आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी या कमानीवर लावण्यात आलेल्या बॅनरमुळे वाद निर्माण झाला आहे.

या संदर्भात बहुजन विकास आघाडी पक्षाने मीरा-भाईंदर महानगरपालिका तसेच स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, आंबेडकर नगर येथे स्थानिक गुजराती समाजाच्या एका कार्यक्रमासाठी एका संस्थेने कमानीवर बॅनर लावला. या बॅनरवर भाजप आमदार नरेंद्र मेहता आणि महापौर डिंपल मेहता यांचे फोटो आहेत. त्यामुळे आंबेडकरांचा अपमान होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

यामुळे संबंधित संस्थेवर अनधिकृत बॅनर लावणे तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे. या मागणीसाठी सोमवारी पालिका मुख्यालयाच्या दुसऱ्या मजल्यावर ठिय्या आंदोलन करण्यात आले.

दरम्यान, “शहर बॅनरमुक्त ठेवण्याचा आमचा निर्धार आहे. तसेच बाबासाहेब आंबेडकरांविषयी आम्हाला अभिमान असून त्यांच्या संबंधित कोणत्याही गोष्टीचा अपमान सहन केला जाणार नाही. संबंधित कृत्य कोणत्या संस्थेने केले याची माहिती नसून प्रशासनाला याबाबत कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत,” अशी माहिती महापौर डिंपल मेहता यांनी माध्यमांशी बोलताना दिली.