भाईंदर :- भाईंदरमध्ये उभारण्यात आलेल्या बाळासाहेब ठाकरे आपला दवाखानावर भाजप नगरसेवकाने आक्षेप नोंदवला आहे. यात अवघ्या ३०० चौरस फुटाच्या बांधकामासाठी ६५ लाखाचा खर्च दाखवण्यात येत असून भ्रष्टाचार केला जात असल्याचे आरोप करण्यात आले आहेत.
भाईंदर पूर्वेतील केबिन रोड परिसरात पालिकेचे आरोग्य केंद्र होते. याच केंद्राची पुनर्रबांधणी करून प्रशासनाने त्याच ठिकाणी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखानाची उभारणी केली आहे. मात्र यात भ्रष्टाचार करण्यात आल्याचे आरोप भाजप नगरसेवक प्रकाश सिंह ( मुन्ना सिंह ) यांनी केले आहेत.यात २०१३ मध्ये सुमारे १२ बाय २५ फुटांच्या या खोलीच्या बांधकामासाठी ८ लाख ४० हजार रुपयांचा खर्च करण्यात आला होता. त्यामध्ये पाच लाख रुपये बांधकामासाठी तर ३ लाख ४० हजार रुपये फर्निचर, वीज व प्लंबिंग कामांसाठी खर्च करण्यात आले होते. हे काम शिवम इंटरप्रायजेस या ठेकेदारामार्फत करण्यात आले होते. त्यानंतर वर्ष २०१८ मध्ये पुन्हा या बांधकामासाठी १३ लाख १९ हजार रुपयांचा खर्च कृति इंटरप्रायजेस या ठेकेदारामार्फत करण्यात आल्याचे कागदपत्रांत नमूद आहे. मात्र कोणतेही पुनर्बांधकाम झाले नव्हते. त्यामुळे केवळ कागदोपत्री काम दाखवून निधीचा अपव्यय करण्यात आल्याचा आरोप होत आहे.
यानंतर वर्ष २०२४ मध्ये एन. जे. ब्रदर्स या ठेकेदाराला दुरुस्ती व नूतनीकरणासाठी तब्बल ४३ लाख ५९ हजार रुपयांचे काम देण्यात आले. मात्र ते देखील योग्य झाले नसून ३०० चौरस फुटाच्या बांधकामावर आजपर्यंत ६५ लाखाहुन अधिकचा खर्च करण्यात आला असल्याची तक्रारी सिंह यांनी दिली आहे.दरम्यान, सदर बांधकाम नियमानुसार करण्यात आले असून कोणतीही गैरव्यवहार झालेला नाही,असे स्पष्टीकरण शहर अभियंता दीपक खांबित यांनी यावर दिले आहे.
