भाईंदर : भाईंदर पूर्वेकडील बी. पी. रोड येथे पदपथ अडवून खाद्यपदार्थांचा स्टॉल उभारण्यात आल्याने स्थानिक नागरिकांनी आक्षेप घेतला आहे. विशेष म्हणजे हा स्टॉल महापालिकेच्या महापौर डिंपल मेहता यांच्या पतीचा असल्याचा दावा करण्यात आला आहे. यासंदर्भातील चित्रफीत समाजमाध्यमांवर प्रसारित झाली आहे.
मिरा-भाईंदर शहरातील अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणांविरोधात कारवाई करण्यासाठी सत्ताधारी पक्षाने सत्तास्थापनेनंतर ‘झिरो टॉलरन्स’चे धोरण जाहीर केले आहे. महापौरांच्या आदेशानंतर प्रशासनाकडून अनधिकृत शेड, स्टॉल आणि इतर बांधकामांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, बी. पी. रोडवरील पदपथ अडवून पत्रे लावून दोन खाद्यविक्रेत्यांचे स्टॉल उभारण्यात आल्याचे समोर आले. स्थानिक नागरिक करण पवार यांनी स्टॉलधारकांना याबाबत जाब विचारला. त्यावेळी स्टॉलच्या मागील बाजूस सुरू असलेल्या पुनर्विकास प्रकल्पातील काही कर्मचारी बाहेर आले आणि त्यांच्याशी हुज्जत घातल्याची चित्रफितीत समाज माध्यमांवर व्हायरल झाली आहे. हा स्टॉल आमदार नरेंद्र मेहता यांचे बंधू विनोद मेहता यांचा असल्याचा दावा यावेळी करण्यात आला.विनोद मेहता हे महापौर डिंपल मेहता यांचे पती आहेत. त्यामुळे शहरातील अतिक्रमणांविरोधात ‘झिरो टॉलरन्स’चे धोरण राबविणाऱ्या सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेवरच या प्रकारामुळे प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.
सदर स्टॉल हे रस्त्याच्या दुसऱ्या बाजुला दुकानाबाहेर लावले जात असून त्याठिकाणी गणेशोत्सवाची तयारी सुरू असल्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात याठिकाणी महापौरांच्या पतीच्या एका पुनर्विकास प्रकल्पाच्या बाहेरच लावण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच या मार्गावर या स्टॉल शिवाय अन्य पथविक्रेतांनी देखील पदपथ अडवून सर्रासपणे व्यवसाय सुरू केला असून यामुळे वाहतूक कोंडीची भीषण समस्या उभी राहत आहे.तर प्रकरणावर महापौरांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी वारंवार संपर्क केला असता त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळाला नाही.
दुसऱ्या दिवशी स्टॉल हटवले
भाईंदर मध्ये पदपथावर उभारण्यात आलेल्या स्टॉल बाबत महापौरांवर आरोप झाल्यानंतर दुसऱ्या दिवशीच हा स्टॉल हटवण्यात आल्याची बाब समोर आली. सदर स्टॉल हा तात्पुरत्या स्वरूपातच उभारण्यात आल्याचा दावा यावेळी स्टॉल चालकांकडून करण्यात आला.
“पदपथ अडवून स्टॉल उभारण्यात आल्याची तक्रार मिळाल्यानंतर अतिक्रमणविरोधी पथकाने पाहणी केली. एका सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे काम सुरू असल्यामुळे हा स्टॉल रस्त्याच्या दुसऱ्या बाजूकडील मोकळ्या जागेत तात्पुरत्या स्वरूपात ठेवण्यात आला होता. मात्र, आता हा स्टॉल हटविण्याचे आदेश देण्यात आले आहेत.”-जितेंद्र कांबळे -प्रभाग अधिकारी, प्रभाग कार्यालय क्रमांक ३
