भाईंदर : भाईंदरमध्ये वृक्षछाटणीचे काम सुरू असताना नगरसेवक भारत कोठारी यांच्यावर झाडाची मोठी फांदी कोसळल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली. या घटनेत त्यांच्या नाकाला व डोक्याच्या बाजूला किरकोळ दुखापत झाली असून सुदैवाने ते थोडक्यात बचावले.
भाईंदरमध्ये दहा दिवसांपूर्वीच दुचाकीस्वार तरुणावर झाड कोसळून माजी उपनगराध्यक्षांचा मुलगा राहुल पाटील यांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर शहरातील धोकादायक झाडांचा प्रश्न ऐरणीवर आला असून महापालिकेकडून वृक्षछाटणी व झाडांच्या संरक्षणाचे काम हाती घेण्यात आले आहे.
याच पार्श्वभूमीवर गुरुवारी सायंकाळी भाईंदर पश्चिम येथील प्रभाग क्रमांक ६ मध्ये वृक्षछाटणीचे काम सुरू असताना अचानक झाडाची मोठी फांदी तुटून खाली पडली. ही फांदी थेट नगरसेवक भारत कोठारी यांच्या अंगावर कोसळली. मात्र त्यांनी प्रसंगावधान राखून बाजूला होताच फांदीचा काही भाग त्यांच्या अंगावर आदळला. त्यामुळे त्यांच्या नाकाला व डोक्याच्या बाजूला किरकोळ दुखापत झाली.
या घटनेचा व्हिडिओ भारत कोठारी यांनी समाजमाध्यमांवर शेअर करत माहिती दिली आहे. दुखापत किरकोळ असल्याने ते सुरक्षित असल्याचे समजताच त्यांच्या समर्थकांसह नागरिकांनी समाधान व्यक्त केले. दरम्यान, शहरातील धोकादायक झाडांकडे वेळेत लक्ष न दिल्यामुळे अशा घटना वारंवार घडत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.
