भाईंदर : ऑनलाइन वस्तूंची डिलिव्हरी करणाऱ्या २४ वर्षीय तरुणावर ब्लेडसारख्या धारदार शस्त्राने आणि दगडांनी जीवघेणा हल्ला झाल्याची घटना भाईंदर पूर्व येथे घडली आहे. या प्रकरणी नवघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भावसागर पांडुरंग भोरगे (२४) असे जखमी डिलिव्हरी बॉयचे नाव आहे. तो वसई येथे राहणारा असून ‘ब्लिंकिट’ या ऑनलाइन डिलिव्हरी सेवेसाठी काम करतो. दरम्यान भोरगे आणि राहुल पासवान यांच्यात तीन हजार रुपयांच्या व्यवहारावरून वाद सुरू होता.
हा वाद मिटविण्याच्या बहाण्याने राहुल पासवानने भोरगे याला भाईंदर पूर्वेतील बाळासाहेब ठाकरे मैदानाजवळ बोलावले होते. तेथे दोघांमध्ये पुन्हा शाब्दिक वाद झाला. त्यानंतर पासवानने भोरगे याच्यावर ब्लेडसारख्या धारदार शस्त्राने पोट व छातीवर वार केल्याचा आरोप आहे. तसेच दगडांनीही मारहाण करण्यात आली. हल्ल्यानंतर आरोपी आपल्या साथीदारांसह घटनास्थळावरून पसार झाले.
या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या भोरगे याला उपचारासाठी भाईंदरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तक्रारीनुसार, हल्लेखोरांनी मारहाण करताना कथितपणे ‘१०५ गँग’चे नाव घेतल्याचेही समोर आले आहे.
दरम्यान, नवघर पोलिसांनी या प्रकरणी संबंधित कलमांन्वये गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला आहे.
