भाईंदर : जगभरात चर्चेत असलेल्या तथाकथित ‘एपस्टीन फाइल्स’च्या मुद्द्यावरून भाईंदरमध्ये रस्त्यावर महिला आणि पुरुष यांच्यात वाद झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी नवघर पोलीस ठाण्यात परस्परांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
येत्या काही दिवसांत वंचित बहुजन आघाडी पक्षाकडून राज्यभर आंदोलन पुकारण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामकाजाबाबत नाराजी व्यक्त करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्याच्या उद्देशाने हे आंदोलन असल्याचे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर मिरा-भाईंदरमध्ये विविध ठिकाणी पक्षाकडून जाहिरात फलक लावले जात आहेत. संबंधित फलकांवर नरेंद्र मोदी यांचा फोटो लावून त्यावर फुली मारण्यात आली आहे.
असा एक फलक पक्षाच्या पदाधिकारी अस्तिमा कदम या लावत असताना तेथून जात असलेल्या कृष्णा गुप्ता यांनी त्यावर आक्षेप घेतला. मोदी यांच्या छायाचित्रावर फुली मारल्यामुळे नाराजी व्यक्त करत त्यांनी कदम यांना जाब विचारला. त्यावर मोदी यांचे नाव ‘एपस्टीन फाइल्स’ मध्ये असल्याचा तसेच देशाची अवस्था बिकट केल्याचा आरोप कदम यांनी केल्याचा दावा कृष्णा याने केला.या कारणावरून दोघांमध्ये वाद निर्माण झाला. काही वेळातच दोन्ही बाजूंच्या समर्थकांमध्ये ढकलाढकली व हाणामारी झाली.
या घटनेत संबंधित व्यक्तीने जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केल्याची तक्रार कदम यांनी पोलीस ठाण्यात दिली आहे. तर कदम आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मारहाण करून जखमी केल्याची तक्रार कृष्णा गुप्ता यांनी नोंदवली आहे. दोन्ही तक्रारींवरून पोलिसांनी परस्परांविरुद्ध गुन्हे दाखल केले असून पुढील तपास सुरू आहे.
