भाईंदर : मिरा-भाईंदरमध्ये मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) मार्फत उभारण्यात आलेल्या वाहतूक उड्डाणपुलाची रचना वादाच्या भोवऱ्यात सापडल्यानंतर युवक काँग्रेसकडून या पुलाचे प्रतीकात्मक ‘विश्वगुरू उड्डाणपूल’ असे नामकरण करण्यात आले. या आंदोलनाची चित्रफीत समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
भाईंदरमध्ये मेट्रो मार्गासमांतर उभारण्यात आलेल्या या पुलाच्या रचनेवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. चार मार्गिकांचा असलेला पूल फाटकाजवळ उतरताना अचानक दोन मार्गिकांचा होत असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. या रचनेवरून एमएमआरडीएवर टीकेची झोड उठली होती. वाद वाढल्यानंतर संबंधित पूल योग्य असून भविष्यातील विस्तार लक्षात घेऊनच त्याची रचना करण्यात आल्याचा दावा प्राधिकरणाकडून करण्यात आला होता. याबाबतचे अधिकृत पत्रक आणि भूमिका समाजमाध्यमांवर प्रसिद्ध करण्यात आली होती. मात्र नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले नाही. परिणामी वाद निवळण्यासाठी प्राधिकरणाने वाहतूक सल्लागाराची नियुक्ती केली.
दरम्यान, वाहतूक सल्लागाराचा अहवाल सादर होण्यापूर्वीच प्राधिकरणाने पुलाच्या रचनेत काही बदल करण्यास सुरुवात केल्याचे दिसून आले आहे. पुलावरून फाटकाकडे उतरताना उभारण्यात आलेले दुभाजक प्रशासनाने काढून टाकले आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांत हा पूल वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र या संपूर्ण प्रकरणावरून पुन्हा टीका होण्याची भीती असल्याने प्रशासनाकडून सावध भूमिका घेतली जात असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, प्रशासनाच्या भूमिकेच्या निषेधार्थ रविवारी मिरा-भाईंदर युवक काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात आले. या वेळी कार्यकर्त्यांनी पुलाचे प्रतीकात्मक ‘विश्वगुरू उड्डाणपूल’ असे नामकरण केल्याचा दावा केला. यासंदर्भातील मोठे फलकही पुलावर लावण्यात आले. “‘यामुळे तरी प्रशासनाचे डोके ठिकाणावर येईल आणि नागरिकांचे कोट्यवधी रुपये वाया जाणार नाहीत,” असा दावा पदाधिकाऱ्यांनी केला.
दरम्यान, पुलाचे काम अपूर्ण असतानाही त्यावर फलक लावल्याप्रकरणी संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.
