भाईंदर :मिरा भाईंदर शहरात एमएमआरडीएने उभारलेला वादग्रस्त उड्डाणपूल आता दिशादर्शक फलकांच्या अभावामुळे चर्चेत आला आहे. पुलावर योग्य दिशादर्शक फलक नसल्याने भाईंदर पश्चिमेकडे जाणाऱ्या प्रवाशांचा गोंधळ होत असून, चुकीच्या मार्गाने गेल्यानंतर त्यांना लांबचा वळसा घालून परतावे लागत आहे.
मिरा भाईंदर शहरातील मुख्य मार्गांवर मेट्रो मार्गिकेसोबत तीन उड्डाणपुलांची उभारणी करण्यात आली आहे. हे पूल वाहतुकीसाठी खुले करण्यात आले आहेत. यातील दीपक हॉस्पिटल ते भाईंदर फाटकदरम्यान उभारण्यात आलेला उड्डाणपूल त्याच्या विशिष्ट रचनेमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. या पुलावर चार मार्गिका असताना अचानक दोन मार्गिकांमध्ये त्याचे रूपांतर होत असल्याने सुरक्षेचा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता.
प्रशासनाने काही उपाययोजना केल्यानंतर हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.मात्र, पूल सुरू झाल्यानंतर भाईंदर पश्चिमेकडे जाणाऱ्या प्रवाशांची अडचण वाढली आहे. भाईंदर पश्चिमेकडे जाणारा उड्डाणपूल या मार्गावर जवळ येत नसून पुढे उतरत असल्याने अनेक प्रवासी नजरचुकीने या पुलावर प्रवेश करतात. त्यानंतर भाईंदर फाटकाच्या दिशेने पुढे जाऊन वळसा घालत पुन्हा इच्छित मार्गावर यावे लागते. दिशादर्शक फलक नसल्यामुळे ही समस्या निर्माण होत असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.त्यामुळे पुलाच्या सुरुवातीस तसेच महत्त्वाच्या ठिकाणी स्पष्ट दिशादर्शक फलक उभारावेत, अशी मागणी प्रवासी अनिल नोटीयाल यांनी केली आहे.
