भाईंदर :- भाईंदर पूर्वेतील आझादनगर परिसरातील महापालिकेच्या आरक्षित भूखंडावरील वादग्रस्त अनधिकृत धार्मिक स्थळावर अखेर सोमवारी पहाटे महापालिकेने अतिक्रमणविरोधी कारवाई केली. सुमारे दोन दशकांपासून अस्तित्वात असलेल्या या धार्मिक स्थळावर मोठ्या पोलीस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली.

भाईंदर पूर्व येथील आझादनगर परिसरात महापालिकेचा १२२ क्रमांकाचा आरक्षित भूखंड असून, या भूखंडावर गेल्या अनेक वर्षांत मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली होती. यामध्ये झोपड्या, गोदामे तसेच काही व्यावसायिक आस्थापनांचा समावेश होता. काही वर्षांपूर्वी या ठिकाणी बाळासाहेब ठाकरे कलादालन उभारण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर भूखंड अतिक्रमणमुक्त करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती.

या मोहिमेदरम्यान भूखंडाचा काही भाग मोकळा करण्यात आला होता. मात्र दुसऱ्या बाजूला असलेल्या झोपड्या आणि इतर अतिक्रमणांमुळे कारवाई पूर्ण होऊ शकली नव्हती. दरम्यान, तीन वर्षांपूर्वी येथील झोपडपट्टी भागात भीषण आग लागून दोन जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर प्रशासनाने कठोर पावले उचलत बहुतांश अतिक्रमणे हटविली होती.परंतु भूखंडावरील धार्मिक स्थळ मात्र कायम ठेवण्यात आले होते.

आरक्षित जागेवर उभारण्यात आलेल्या या धार्मिक स्थळाबाबत गेल्या काही वर्षांपासून वाद सुरू होता. हे स्थळ जुने असल्याने ते कायम ठेवावे, अशी मागणी होत होती. तर दुसरीकडे आरक्षित भूखंडावरील सर्व अतिक्रमणे हटविण्याच्या भूमिकेवर प्रशासन ठाम होते. आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर या स्थळावर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

त्याअनुषंगाने सोमवारी पहाटे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करून महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई सुरू केली. कारवाईदरम्यान परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. मात्र प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात ठेवत सकाळी साडेदहाच्या सुमारास कारवाई पूर्ण केली आणि संपूर्ण जागा मोकळी करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.