भाईंदर :- भाईंदर येथील जेसल पार्क परिसरातील जैन मंदिर चौकाच्या मध्यभागी बांधकाम करण्याची मागणी स्थानिक नगरसेवकांनी केली आहे. मात्र, यामुळे भविष्यात या मार्गावरून होणाऱ्या गणेश विसर्जन मिरवणुकांना अडथळे निर्माण होण्याची शक्यता असल्याने हे काम करू नये, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात आली आहे.
भाईंदर पूर्व-पश्चिमेला जोडणाऱ्या भुयारी मार्गातून पूर्वेकडे बाहेर पडताच जैन मंदिर चौक लागतो. हा रस्ता आधीच अरुंद असून या मार्गावर वाहतुकीची मोठी कोंडी होत असते. दरम्यान, या ठिकाणी नव्याने चौक उभारण्याची मागणी स्थानिक भाजप नगरसेवकांनी प्रशासनाकडे केली आहे. त्यानुसार प्रशासनाने येथे बांधकाम करण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी निविदा प्रक्रिया व इतर कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. मात्र, या रस्त्यावर चौक उभारण्यात आल्यास भविष्यात मोठ्या अडचणी निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे, भाईंदरच्या खाडी भागाकडे जाण्यासाठी हा एकमेव प्रमुख मार्ग असून याच मार्गावरून मोठ्या गणेशमूर्तींची वाहतूक केली जाते. त्यामुळे या बाबींचा विचार न करता चौक उभारल्यास गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात.त्यामुळे प्रशासनाने या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या बांधकामास परवानगी देऊ नये, अशी मागणी स्थानिक नागरिक रवि मिश्रा यांनी केली आहे.
