भाईंदर : भाईंदर पश्चिम येथील पंडित भीमसेन जोशी सरकारी रुग्णालयात हृदयविकाराच्या रुग्णांसाठी आता नवीन उपचार केंद्र सुरू होणार आहे. रुग्णालयात कार्डियाक कॅथलॅब उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात असून, डिसेंबरपूर्वी ही सुविधा सुरू होण्याची शक्यता आहे. या केंद्रात मुलांच्या हृदयातील छिद्रांवर तसेच प्रौढांच्या हृदयातील रक्तवाहिन्यांमधील अडथळ्यांवर मोफत उपचार आणि शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत.
भाईंदर पश्चिम येथील या रुग्णालयात २०० खाटांची व्यवस्था आहे. सध्या काही मोजक्या आजारांवरच येथे उपचार केले जात असले तरी रुग्णांची संख्या मोठी आहे. त्यामुळे रुग्णालयाची क्षमता वाढविण्यासाठी मागील काही वर्षांपासून विविध सुविधा सुरू करण्याचे काम करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आता हृदयविकाराच्या उपचारांसाठी स्वतंत्र केंद्र उभारण्यात आले आहे.मार्च २०२४ मध्ये कार्डियाक कॅथलॅबला मंजुरी मिळाल्यानंतर रुग्णालयाच्या आवारात स्वतंत्र इमारत उभारण्यात आली आहे. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर तातडीने उपचार मिळणे महत्त्वाचे असल्याने ही इमारत रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ उभारण्यात आली आहे.रुग्णालयाचे अधीक्षक तथा शल्यचिकित्सक डॉ. जाफर तडवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, कॅथलॅबचे नागरी आणि विद्युत काम तसेच उपकरणे बसविण्याचे काम पूर्ण झाले आहे. अतिदक्षता विभागातील १० खाटा तयार करण्यात आल्या आहेत. तसेच चार परिचारिकांचे जे. जे. रुग्णालयात प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. डॉक्टर, तंत्रज्ञ आणि इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीसाठी आरोग्य विभागाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.
या केंद्रात अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टीसह हृदयाशी संबंधित विविध उपचार करण्यात येणार आहेत. मुलांच्या हृदयातील छिद्रांची तपासणी आणि त्यावरील उपचाराची सुविधाही येथे उपलब्ध होणार आहे. त्यामुळे मीरा-भाईंदरसह मुंबई आणि गुजरातच्या दिशेने उपचारासाठी जाणाऱ्या रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.जोशी रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी असल्याने या नव्या सुविधेमुळे रुग्णालयाची उपचार क्षमता वाढणार आहे. विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना हृदयावरील महागडे उपचार मोफत मिळणार असल्याने हे केंद्र महत्त्वाचे ठरणार आहे.
