भाईंदर :- मिरा रोड येथील कनकिया परिसरातील स्टार बाजारातील भाजीपाला विभागात उंदीर फिरत असल्याचा कथित व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी संबंधित शाखेला भेट देत तीव्र आक्षेप नोंदविला आहे.यानंतर अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले असून कतपासणी करून पुढील कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे.

या बाजारातील भाजीपाला विभागात उंदीर, झुरळे, उंदरांच्या विष्ठेच्या खुणा तसेच सडलेल्या व बुरशी आलेल्या भाज्या आढळून आल्या आहेत. त्यामुळे ग्राहकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी विडिओ द्वारे करण्यात आली होती.समाजमाध्यमांवर व्हायरल झालेल्या व्हिडिओची दखल घेत मनसेचे पदाधिकारी सचिन पोकळे आणि कार्यकर्त्यांनी स्टार बाजारात जाऊन पाहणी केली. त्यानंतर अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलाविण्यात आले. अधिकाऱ्यांनी बाजाराची तपासणी करून नमुने व इतर बाबींची पडताळणी केली असून नियमानुसार पुढील कारवाई केली जाणार असल्याचे सांगितले.

दरम्यान, ग्राहकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्या कोणत्याही व्यावसायिक आस्थापनावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मनसेकडून करण्यात आली आहे.दरम्यान नामांकित स्टार बाजार मध्ये हे कृत्य समोर आल्यामुळे नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तर या संदर्भात योग्य स्पष्टीकरण वरिष्ठ लवकरात यदेतील अशी माहिती येथील कर्मचाऱ्यांकडून देण्यात आली आहे.