भाईंदर : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील खड्ड्यामुळे दुचाकीचा अपघात होऊन १२ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याचे सुरुवातीला समोर आले होते. मात्र, पोलिसांच्या तपासात आणि सीसीटीव्ही चित्रीकरणाच्या पाहणीत अपघाताचे कारण खड्डा नसून सिमेंट काँक्रीट वाहून नेणाऱ्या डंपर चालकाने अचानक सर्व्हिस रस्त्याच्या दिशेने वाहन वळविल्याने दुचाकीला धडक बसल्याचे स्पष्ट झाले आहे.

या धडकेत दुचाकीवरील सौरभ विश्वकर्मा (१२) खाली पडला आणि डंपरच्या मागील चाकाखाली सापडून त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी डंपर चालकाविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.२४ ऑगस्ट रोजी सौरभ शाळा सुटल्यानंतर वडिलांसोबत दुचाकीवरून घरी जात होता. दहिसर टोलनाक्याजवळ गोदावरी लॉजसमोर महामार्गावरून दुचाकी जात असताना मागून आलेल्या सिमेंट काँक्रीट वाहून नेणाऱ्या डंपर चालकाने अचानक सर्व्हिस रस्त्याच्या दिशेने वाहन वळविले. त्यावेळी डंपरची दुचाकीच्या हँडलला धडक बसली. या धडकेमुळे दुचाकी चालकाचा तोल जाऊन तो खाली पडला, तर सौरभ रस्त्याच्या एका बाजूला फेकला गेला. त्याचवेळी डंपरच्या मागील चाकाखाली सापडल्याने सौरभचा जागीच मृत्यू झाला.

अपघातानंतर सुरुवातीला महामार्गावरील खड्ड्यात दुचाकी आदळल्याने वडिलांचा तोल गेल्याचे आणि त्यानंतर सौरभ डंपरखाली सापडल्याचे आरोप करण्यात आले होते. त्यामुळे महामार्गावरील खड्ड्यांचा मुद्दा ऐरणीवर आला होता. मात्र, पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासल्यानंतर अपघाताचे नेमके कारण स्पष्ट झाले.या अपघातात सौरभचे वडीलही जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी डंपर चालकाविरोधात वाहतुकीस प्राणघातक ठरणारी कृती केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.अशी माहिती काशिमिरा वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रफुल्ल वाघ यांनी दिली आहे.

खड्डे भरल्याचा प्राधिकरणाचा दावा

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील खड्ड्यांबाबत काशिमिरा वाहतूक शाखेने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला पत्र देऊन तक्रार केली होती. त्यानंतर प्राधिकरणाकडून महामार्गावरील खड्डे भरण्याचे काम करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, महामार्गावरील खड्ड्यांबाबत यापूर्वीही तक्रारी करण्यात आल्याने रस्त्याची नियमित देखभाल आणि दुरुस्तीचा प्रश्न अद्याप कायम असल्याचे चित्र आहे.