वसई: भाईंदर-नायगाव खाडीपुलाच्या प्रतिबंधित क्षेत्रात अवैध प्रवेश करून धोकादायक स्टंटबाजी करणाऱ्या तरुणांना अखेर रेल्वे प्रशासनाच्या कारवाईनंतर माफी मागावी लागली आहे. पश्चिम रेल्वेच्या अधिकृत ‘एक्स’ (ट्विटर) खात्यावरून या तरुणांचा माफीनामा असलेला व्हिडिओ प्रसारित करण्यात आला आहे.

सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी स्टंटबाजी गरज असल्याचे बरेच व्हिडिओ आपण पाहतो. असाच व्हिडिओ भाईंदर रेल्वे परिसरातूनही समोर आला होता. ऑगस्ट महिन्यात काही तरुणांनी नायगाव-भाईंदर खाडीपुलावरील लोखंडी डक्ट उघडून आत प्रवेश करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केला. पुलाच्या खालच्या भागात शिडीवरून उतरत त्यांनी पुलाच्या सळईला लटकून पुल-अप्स मारले, तसेच स्प्रे पेंटच्या साहाय्याने रेल्वेच्या मालमत्तेवर चित्रे काढून तिची विटंबना केल्याचेही या व्हिडिओत पाहायला मिळाले होते.  या प्रकारचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी तरुणांच्या हलगर्जीपणाबाबत व रेल्वे  सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित केले होते. 

त्यानंतर रेल्वे प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेत भाईंदर आरपीएफ ठाण्यात रेल्वे कायद्याच्या कलम १४५ (उपद्रव करणे) आणि १४७ (विनापरवाना अतिक्रमण) अंतर्गत गुन्हा दाखल केला. त्यानंतर भाईंदर रेल्वे पोलीस ठाण्यात या तरुणांनी आपली चूक मान्य करत माफी मागितली. पश्चिम रेल्वेने “द स्टंट वॉज फॉर रील्स, द आरपीएफ ॲक्शन वॉज रिअल” या कॅप्शनसह हा व्हिडिओ शेअर केला आहे.

व्हिडिओमध्ये दिसणारे सहा तरुण “आम्ही केलेली चूक कोणीही करू नये. प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश करणे आणि स्टंटबाजी करणे जीवघेणे ठरू शकते. यामुळे गुन्हेगारी नोंद होऊन तुमच्या भविष्यावर आणि शिक्षणावर परिणाम होऊ शकतो,” असे आवाहन करताना दिसत आहेत.