वसई :- पश्चिम रेल्वेवरील सातत्याने वाढणारी प्रवासी संख्या आणि रेल्वे पोलिसांवरील कामाचा वाढता ताण लक्षात घेता, मुंबई रेल्वे पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत ‘भाईंदर रेल्वे पोलीस ठाण्याची’ नवी निर्मिती करण्यात आली आहे. बुधवारी राज्याचे रेल्वे पोलीस महासंचालक प्रशांत बुरडे यांच्या शुभहस्ते या पोलीस ठाण्याचे उद्घाटन पार पडले. पालघर ते चर्चगेट दरम्यानचे हे आठवे पोलीस ठाणे आहे तर मुंबई रेल्वे पोलीस आयुक्तालयातील २१ वे पोलीस ठाणे ठरले आहे.
प्रवाशांची गैरसोय आणि वसई पोलिसांवरील ताण
सध्या पालघर ते चर्चगेट दरम्यान ७ रेल्वे पोलीस ठाणी कार्यरत होती. यातील वसई रेल्वे पोलीस ठाण्याच्या अखत्यारीत मिरा रोड आणि भाईंदरपासून ते थेट वैतरणापर्यंत अशा तब्बल सात रेल्वे स्थानकांचा विस्तृत परिसर येत होता. त्यामुळे मिरा रोड किंवा भाईंदर परिसरात कोणत्याही गुन्ह्याची तक्रार नोंदवण्यासाठी अथवा कायदेशीर मदतीसाठी प्रवाशांना थेट वसई गाठावे लागत होते. परिणामी, प्रवाशांचा मोठा वेळ वाया जाऊन त्यांची प्रचंड गैरसोय होत होती. दुसरीकडे, विस्तीर्ण कार्यक्षेत्र आणि अपुऱ्या मनुष्यबळामुळे वसई रेल्वे पोलीस ठाण्याच्या प्रशासकीय कामकाजावर आणि कायदा-सुव्यवस्थेवरही मोठा ताण येत होता.
उद्घाटन सोहळा उत्साहात
प्रवाशांची वाढती गर्दी आणि त्यांच्या सुरक्षेला दिलेले प्राधान्य या पार्श्वभूमीवर अखेर नवीन भाईंदर रेल्वे पोलीस ठाणे सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्याचे रेल्वे पोलीस महासंचालक प्रशांत बुरडे यांच्या शुभहस्ते या नवनिर्मित पोलीस ठाण्याचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला.याप्रसंगी मुंबई रेल्वे पोलीस आयुक्त एम. राकेश कलासागर, अतिरिक्त मंडळ रेल्वे व्यवस्थापक यशपाल कुमार, मुख्य सुरक्षा आयुक्त अजोय सदानी, मुंबई रेल्वे पोलीस उपआयुक्त सुनिता साळुंखे-ठाकरे, मुंबई सेंट्रल वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त एस. के. एस. राठोड, मध्य क्षेत्र मुंबई रेल्वे पोलीस उपआयुक्त प्रज्ञा जेडगे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त मनीषा रावखंडे यांच्यासह इतर पोलीस अधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सुरक्षा अन् समन्वयावर भर
प्रवाशांची वाढती गर्दी तसेच रेल्वे प्रवाशांच्या समस्या निवारणाच्या दृष्टीने हे पोलीस ठाणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार असल्याचा विश्वास रेल्वे पोलीस महासंचालक प्रशांत बुरडे यांनी व्यक्त केला आहे. पश्चिम रेल्वेवरील वाढती गर्दी लक्षात घेता हे नवीन पोलीस ठाणे तयार करण्यात आले आहे. सद्यस्थितीत या ठिकाणी २ पोलीस अधिकारी व ४७ पोलीस कर्मचारी असे मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात आले आहे. रेल्वे सुरक्षा बल आणि रेल्वे पोलीस अशी दोन्ही कार्यालये एकाच इमारतीत असल्याने परस्पर समन्वय साधणे अधिक सुलभ होणार असल्याची प्रतिक्रिया मुंबई रेल्वे पोलीस आयुक्त एम. राकेश कलासागर यांनी दिली आहे.
भाईंदर पोलीस ठाण्यात ‘या’ स्थानकांचा समावेश
वसई रेल्वे पोलीस ठाण्याचे विभाजन करून भाईंदर नवीन पोलीस ठाणे तयार करण्यात आले आहे. या पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहिसर, मिरा रोड, भाईंदर आणि नायगाव अशा चार रेल्वे स्थानकांचा समावेश करण्यात आला आहे. गणपत तुंबडा यांची या नवीन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, तर वसई पोलीस ठाण्याचा पदभार राजू महानोर यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
