वसई: कांदिवली आणि बोरीवली रेल्वे स्थकादरम्यान सहाव्या मार्गिकेचे काम पूर्ण झाले असल्यामुळे भाईंदर स्थानकातून १ फेब्रुवारीपासून अप आणि डाऊन धीम्या मार्गांवर चार अतिरिक्त सामान्य लोकल सुरू करण्यात येणार आहेत. त्यामुळे भाईंदर ते चर्चगेट प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

पश्चिम रेल्वे स्थानकांपैकी भाईंदर रेल्वे स्थानक हे एक महत्वाचे रेल्वे स्थानक आहे. मुंबई तसेच ठाण्याच्या दिशेने दररोज लाखो प्रवासी या स्थानकातून प्रवास करतात. पण, सकाळ आणि संध्याकाळच्या सुमारास होणाऱ्या गर्दीमुळे प्रवाशांना लोकलने प्रवास करणे कठीण होऊन बसले होते. तर वसई आणि विरार स्थानकातून आधीच प्रवाशांनी भरून येणाऱ्या लोकल, एसी लोकलच्या वाढलेल्या फेऱ्या, अचानक रद्द होणाऱ्या लोकल, कोलमडले वेळापत्रक यामुळे प्रवाशांवर लोकलच्या दरवाज्यावर लटकून धोकादायक प्रवास करण्याची वेळ आली होती.

ज्यावेळेस रेल्वे प्रशासनाने एसी लोकलच्या फेऱ्या वाढवण्याची घोषणा केली होती. त्यावेळेस अनेक प्रवाशांनी सामान्य लोकलच्या फेऱ्याही वाढवण्यात याव्यात, अशी मागणी रेल्वे प्रशासनाकडे केली होती. त्यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी येत्या एक फेब्रुवारीपासून भाईंदर ते वांद्रे आणि भाईंदर ते चर्चगेट या दोन्ही स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गांवर बारा डब्याच्या लोकलच्या अतिरिक्त दोन-दोन अशा एकूण चार सेवा सुरू करण्यात येणार आहेत. या नवीन सेवांमुळे पश्चिम रेल्वेवरील दैनंदिन सेवांची एकूण संख्या १ हजार ४०६ वरून आता १ हजार ४१० वर पोहोचणार आहे.

कांदिवली आणि बोरिवली दरम्यानच्या सहाव्या मार्गाचे बांधकाम पूर्ण झाल्यामुळे ही वाढ शक्य झाली आहे. सहावा मार्ग कार्यान्वित झाल्यानंतर, वांद्रे टर्मिनसकडे जाणाऱ्या सर्व लांब पल्ल्याच्या गाड्या बोरिवली आणि वांद्रे टर्मिनस दरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गावर वळवण्यात आल्या आहेत, ज्यामुळे परिचालन कार्यक्षमता सुधारली असल्याची माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी दिली आहे. तसेच या सेवा सुरू झाल्यामुळे, काही विद्यमान उपनगरीय सेवांच्या वेळापत्रकात किरकोळ बदल होतील. याची प्रवाशांनी नोंद घ्यावी, असे आवाहनही रेल्वे प्रशासनाने केले आहे.

या सर्व फेऱ्या धीम्या मार्गावर धावतील.

अप दिशा (चर्चगेटच्या दिशेने):
१. भाईंदर ते वांद्रे: सकाळी ११:३९ वाजता सुटेल.
२. भाईंदर ते चर्चगेट: दुपारी १२:१४ वाजता सुटेल.

डाऊन दिशा (विरारच्या दिशेने):
१. वांद्रे ते भाईंदर: पहाटे ०४:३० वाजता सुटेल.
२. वांद्रे ते भाईंदर: दुपारी १३:२१ वाजता सुटेल.