वसई: पश्चिम रेल्वेवरील सातत्याने वाढणारी प्रवासी संख्या आणि रेल्वे पोलिसांवरील कामाचा वाढता ताण लक्षात घेता, मुंबई रेल्वे पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत ‘भाईंदर रेल्वे पोलीस ठाण्याची’ नवी निर्मिती करण्यात आली आहे. पालघर ते चर्चगेट दरम्यानचे हे ८ वे रेल्वे पोलीस ठाणे ठरणार असून, याचा भव्य उद्घाटन सोहळा बुधवारी, ५ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजता भाईंदर पूर्व येथील फलाट क्रमांक ६ जवळ पार पडणार आहे.

​सध्या पालघर ते चर्चगेट दरम्यान ७ रेल्वे पोलीस ठाणी कार्यरत होती. यातील वसई रेल्वे पोलीस ठाण्याच्या अखत्यारीत मिरा रोड आणि भाईंदरपासून ते थेट वैतरणापर्यंत अशा सात रेल्वे स्थानकांचा विस्तृत परिसर येत होता. त्यामुळे मिरा रोड किंवा भाईंदर परिसरात कोणत्याही गुन्ह्याची तक्रार नोंदवण्यासाठी अथवा कायदेशीर मदतीसाठी प्रवाशांना थेट वसई गाठावे लागत होते. यामुळे प्रवाशांचा मोठा वेळ वाया जाऊन त्यांची प्रचंड गैरसोय होत असे. दुसरीकडे, विस्तीर्ण कार्यक्षेत्र आणि अपुऱ्या मनुष्यबळामुळे वसई रेल्वे पोलीस ठाण्याच्या प्रशासकीय कामकाजावर आणि कायदा-सुव्यवस्थेवर मोठा ताण येत होता.

​प्रवाशांची वाढती गर्दी आणि त्यांच्या सुरक्षेला दिलेले प्राधान्य या पार्श्वभूमीवर अखेर नवीन भाईंदर रेल्वे पोलीस ठाणे सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या नवनिर्मित पोलीस ठाण्याचे उद्घाटन राज्याचे रेल्वे पोलीस महासंचालक प्रशांत बुरडे यांच्या शुभहस्ते होणार आहे. याप्रसंगी मुंबई रेल्वे पोलीस आयुक्त राकेश कलासागर, विभागीय रेल्वे व्यवस्थापक पंकज सिंग, मुख्य सुरक्षा आयुक्त अजोय सादाने, मुंबई रेल्वे पोलीस उपआयुक्त सुनिता साळुंखे-ठाकरे, मुंबई सेंट्रल वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त एस. के. एस. राठोड, मध्य क्षेत्र मुंबई रेल्वे पोलीस उपआयुक्त प्रज्ञा जेडगे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त मनीषा रावखंडे हे सर्व मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती रेल्वे पोलिसांनी दिली आहे.

भाईंदर पोलीस ठाण्यात या स्थानकांचा समावेश

वसई रेल्वे पोलीस ठाण्याचे विभाजन करून भाईंदर नवीन पोलीस ठाणे तयार करण्यात आले आहे.  या पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहिसर, मिरारोड, भाईंदर आणि नायगाव अशा चार रेल्वे स्थानकांचा समावेश करण्यात आला आहे. गणपत तुंबडा यांची या नवीन पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर वसई पोलीस रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू महानोर हे काम पाहत आहेत.