भाईंदर: भाईंदर रेल्वे स्थानकात मंगळवारी सकाळी एक भीषण दुर्घटना घडली आहे. फलाट क्रमांक २ च्या शेजारील रेल्वे रुळावरून जाणाऱ्या लोकलच्या धडकेत २७ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. याबाबत रेल्वे पोलिसांकडून तपास केला जात.

भाईंदर रेल्वे स्थानक हे पश्चिम रेल्वे मार्गावरील अत्यंत वर्दळीचे रेल्वे स्थानक आहे. दररोज हजारो प्रवासी या स्थानकातून ये-जा करतात. मात्र, स्थानकातील वाढती गर्दी आणि लोकलमध्ये चढताना होणारी चढाओढ यामुळे अनेकदा अपघाताच्या घटना देखील समोर येत असतात. अशीच एक घटना मंगळवारी सकाळी भाईंदर रेल्वे स्थानकात घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळच्या सुमारास जेव्हा कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांची स्थानकावर मोठी गर्दी होती, त्याच वेळी फलाट क्रमांक २ वरील रेल्वे रुळावर हा अपघात घडला. चर्चगेटच्या दिशेने वेगाने जाणाऱ्या एका लोकल गाडीची धडक या २७ वर्षीय तरुणाला बसली. ही धडक इतकी भीषण होती की, संबंधित तरुणाचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच स्थाकातील प्रवाशांनी आरडाओरड सुरु केली. त्यानंतर कर्तव्यावर असलेल्या रेल्वे पोलिसांनी आणि रेल्वे सुरक्षा बलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून तरुणाचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी जवळच्या शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

मृत तरुणाकडे कोणत्याही प्रकारचे ओळखपत्र किंवा कागदपत्रे न सापडल्याने त्याची ओळख पटलेली नाही. तसेच त्याने रुळ ओलांडताना हा अपघात झाला की ही आत्महत्येची घटना आहे, याबाबत अद्याप स्पष्टता झालेली नाही. त्यामुळे सीसीटीव्ही फूटेज तपासल्यानंतर आणि प्रत्यक्षदर्शींच्या जबाबावरून हा अपघात होता की आत्महत्या, हे लवकरच स्पष्ट होईल. मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी आम्ही आजूबाजूच्या पोलीस ठाण्यांशीही संपर्क साधत आहोत, माहिती भाईंदर रेल्वे पोलिसांनी दिली आहे.

वाहतुकीवर परिणाम

या दुर्घटनेमुळे काहीकाळ लोकल गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम झाला होता. र्चगेटच्या दिशेने जाणारी धीम्या मार्गावरील वाहतूक काही काळासाठी थांबवण्यात आली होती. यामुळे या मार्गावरील लोकल काहीशा उशिरा धावत असल्याने स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी उसळली होती.