वसई: भाईंदर रेल्वे स्थानकात भरधाव लोकलखाली आलेल्या एका प्रवाशाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी घडली. समाजमाध्यमांवर यासंबंधीचे व्हिडिओ व्हायरल झाले असून रेल्वे प्रवाशांच्या वाढत्या अपघातांचा प्रश्न यामुळे पुन्हा चर्चेत आला आहे.

पश्चिम रेल्वे मार्गावरील भाईंदर रेल्वे स्थानक हे अत्यंत वर्दळीचे आणि गर्दीचे रेल्वे स्थानक आहे. दररोज हजारो प्रवासी या रेल्वे स्थानकातून प्रवास करतात. पण, दिवसेंदिवस स्थानकात वाढणारी प्रवाशांची गर्दी आणि लोकलमध्ये चढण्यासाठी होणारी चढाओढ यामुळे अनेकदा अपघाताच्या घटना समोर येत असतात

बुधवारी, ६ मे रोजी भाईंदर रेल्वे स्थानकात अशीच एक घटना समोर आली आहे. फलाट क्रमांक ६ नजिकच्या रुळावरून जाणाऱ्या भरधाव लोकलखाली एक इसम आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास घडली. या घटनेची माहिती मिळताच जीआरपी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह बाहेर काढला असून तो शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली आहे. तसेच मयत व्यक्तीची ओळख पटली नसून हा नेमका अपघात आहे की आत्महत्या याबाबतही ठोस माहिती समोर येऊ शकलेली नाही, असेही रेल्वे पोलिसांनी सांगितले आहे.

यापूर्वीही महिन्याभरापूर्वी फलाट क्रमांक २ च्या शेजारील रेल्वे रुळावरून जाणाऱ्या लोकलच्या धडकेत २७ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. एकामागून एक सतत अशा रेल्वे अपघाताच्या घटना समोर येत असल्यामुळे रेल्वेप्रवशांकडून याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.