भाईंदर :- भाईंदर रेल्वे स्थानकावर नव्याने उभारण्यात आलेल्या तिकीट घर परिसराच्या देखरेखी कडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. परिणामी, या ठिकाणी कचरा, भटक्या श्वानांचा वावर आणि इतर गैरसोयींचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे.

भाईंदर रेल्वे स्थानकावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी येथे कोट्यवधी रुपये खर्च करून विविध कामे करण्यात आली आहेत. अवघ्या वर्षभरापूर्वीच भाईंदर पश्चिम येथील स्थानक परिसराचे सुशोभीकरण करून त्याखाली नवे तिकीट घर उभारण्यात आले होते.

मात्र, सध्या या परिसराच्या देखरेखी कडे प्रशासनाचे पूर्णतः दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. स्थानक परिसरात जागोजागी भटके श्वान झोपलेले दिसतात. त्यामुळे तिकीट काढण्यासाठी येणाऱ्या महिला आणि वृद्ध नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

याशिवाय, स्थानक परिसरात ठिकठिकाणी कचरा साचलेला असून काही ठिकाणी थुंकल्यामुळे अस्वच्छता वाढली आहे. या दुर्गंधी आणि घाणीमुळे नागरिक हैराण झाले आहेत. तसेच, येथे उभारण्यात आलेला हिरकणी कक्ष देखील मोडकळीस आला आहे.या सर्व गैरसोयींमुळे प्रवासी त्रस्त झाले असून प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे