वसई : भाईंदर रेल्वे स्थानकात धावत्या ट्रेनखाली झोपून आत्महत्या करणार्या वसईतील मेहता पिता पुत्रांच्या या आत्महत्येचे गूढ अखेर उकलले आहे. जय मेहता याने अन्य धर्मीय मुलीशी लग्न केले होते. ते प्रकरण उघडकीस झाल्याने समाजात बदनामी होईल या भीतीपोटी दोघांनी आत्महत्या केल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. जयचा मोबाईल फोन, कार्यालयात सापडलेली डायरी तसेच त्याची पहिली पत्नी आणि दुसर्या पत्नीच्या जबानीतून या प्रकरणाचा खुलासा झाला आहे.
हरिष मेहता (६०) हे मुलगा जय मेहता (३०) याच्यासह वसईच्या वसंत नगरी येथील रश्मी दिव्य हाऊस संकुलात राहत होते. जयचा काही महिन्यांपूर्वी एका दाक्षिणात्य मुलीशी प्रेमविवाह झाला होता. सोमवार ७ जुलै रोजी मेहता पिता-पुत्र भाईंदर रेल्वे स्थानकात धावत्या ट्रेनखाली आत्महत्या केली होती. दोघे स्थानकात उतरून चालत जाताना आणि अगदी सहज ट्रेनखाली झोपल्याचे सीसीटीव्ही मध्ये दिसत असल्याची चित्रफित सर्वत्र व्हायरल झाली होती. त्यांनी आत्महत्या का केली याचे गूढ होते. चौकशीनंतर या प्रकरणात धक्कादायक खुलासा झाला आहे. जय मेहता याचे एका मुस्लिम तरुणीशी मागील १० वर्षांपासून प्रेमसंबंध होते. त्या दोघांनी प्रतित्रापत्राद्वारे लग्नही केले होते. पंरतु आपला समाज मुस्लिम तरुणीला स्वीकारणार नाही म्हणून त्याने तिला अंधारात ठेवून दाक्षिणात्य मुलीशी प्रेमविवाह केला होता.
हेही वाचा…वेलंकनीला जाणारे शेकडो भाविक वसई स्थानकात अडकले; १० तासांपासून ट्रेनच्या प्रतिक्षेत
जयच्या पहिल्या पत्नीला ही बाब समजल्यानंतर तिने याबाबत जाब विचारला आणि पत्नीला सोड असा दबाव टाकायला सुरुवात केली. दरम्यान, दुसर्या पत्नीलाही जय मेहताचे प्रेमप्रकरण समजल्याने त्यांच्यातही वाद सुरू झाले होते. पहिली पत्नी जयवर सतत दबाब टाकत होती. हे प्रकरण सर्वांना समजल्यास बदनामी होईल अशी मेहता पिता पुत्रांना भीती होती. त्यामुळे त्यांनी आत्महत्येचा मार्ग पत्करला अशी माहिती वसई रेल्वे पोलिसांनी दिली. जयच्या मरोळ येथील कार्यालयात सापडलेल्या एका डायरीत त्याने दोन्ही पत्नींना उद्देशून लिहिलेल्या पत्रात माफी मागितली होती. पोलिसांनी जयच्या मोबाईल मधील सीडीआर (कॉल्सचे तपशील), डायरी यातून या प्रकरणाचा खुलासा झाला. आम्ही दोन्ही पत्नींचे जबाब नोंदविले आहेत. मात्र कुणाची तक्रार नसल्याने गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही, असे वसई रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगवान डांगे यांनी सांगितले.
© The Indian Express (P) Ltd