भाईंदर : रक्षाबंधन म्हणजे भावा-बहिणीच्या प्रेमाचे, विश्वासाचे आणि रक्षणाच्या वचनाचे प्रतीक. याच सणाच्या पार्श्वभूमीवर भाईंदरमध्ये बहिणीच्या अथांग प्रेमाचे आणि त्यागाचे भावूक उदाहरण समोर आले आहे. भाईंदरमधील २७ वर्षीय ऋषिकेश नलावडे याला त्याच्या ४१ वर्षीय बहिणीने स्वतःची किडनी देऊन नवे जीवन दिले. गेल्या महिन्यात ऋषिकेशवर मूत्रपिंड प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्याची प्रकृती आता स्थिर आहे.
ऋषिकेशला २०१८ पासून मूत्रपिंडाचा आजार होता. डोकेदुखी, उच्च रक्तदाब आणि जुलाबाचा त्रास होत असल्याने तपासणी केली असता त्याच्या रक्तातील क्रिएटिनिनचे प्रमाण वाढल्याचे आणि मूत्रपिंडाची कार्यक्षमता कमी झाल्याचे आढळले. औषधोपचारामुळे काही वर्षे प्रकृती नियंत्रणात होती. मात्र, पुढे आजार वाढल्याने मूत्रपिंड प्रत्यारोपणाची गरज निर्माण झाली.
त्यावेळी त्याची मोठी बहीण कल्पना कोकाटे यांनी किडनी देण्याचा निर्णय घेतला. आवश्यक तपासणीनंतर त्या किडनी दान करण्यासाठी योग्य असल्याचे स्पष्ट झाले. भावाला त्रास होताना पाहणे शक्य नव्हते. त्याला पुन्हा निरोगी आणि सामान्य आयुष्य जगताना पाहायचे होते,असे कल्पना यांनी सांगितले.रुग्णालयातील डॉक्टरांच्या माहितीनुसार, प्रत्यारोपणानंतर ऋषिकेशची प्रकृती स्थिर असून त्याचे क्रिएटिनिनचे प्रमाण सामान्य झाले आहे. किडनी दान करणाऱ्या कल्पना यांचीही प्रकृती चांगली असून त्यांनी दैनंदिन कामकाज सुरू केले आहे.तर आता तीन महिन्यानंतर आपण सक्रिय पणे काम करून कुटुंबाची काळजी घेणार असल्याचे ऋषिकेशने लोकसत्तेला सांगितले.
बहिणीचा निर्णय, पतीची साथ
ऋषिकेश हा पाच भावंडांमध्ये चार बहिणींनंतरचा एकुलता भाऊ आहे. त्यामुळे त्याच्यावरील उपचारांसाठी तिसऱ्या क्रमांकाच्या विवाहित बहिणीने आपली किडनी देण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय घेताना तिने सुरुवातीला सासरच्या कुटुंबीयांनाही याबाबत माहिती दिली नव्हती. मात्र, तिच्या या निर्णयाला पतीने पूर्ण साथ दिली. प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानंतरच कुटुंबीयांना याबाबत माहिती देण्यात आली.
