भाईंदर :- मिरा भाईंदर शहराचे माजी उपनगराध्यक्ष अशोक पाटील यांच्या मुलगा राहुल पाटील यांचा झाड दुर्घटनेत शुक्रवारी मृत्यू झाल्याची घटना घडली. मात्र त्यानंतर ही शहरात अधिकारी- लोकप्रतिनिधी सुस्त बसलेले असून शहरातले वातावरण शांत असल्याचे दिसून येत आहे. भाईंदरच्या राई गावातून दुचाकीने प्रवास करत असताना मंगळवारी (३० जून) अंगावर नारळाचे झाड पडून राहुल पाटील या तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली होती. यावर मागील दोन दिवसापासून उपचार सुरू असताना शुक्रवारी त्याची प्राणज्योत मालावली.

धोकादायक झाड कोसळून हा मृत्यू झाल्याची ही घटना असल्यामुळे नागरिकांकडून प्रशासनाचे कारभारावर संताप व्यक्त केला जात आहे.
दरम्यान सायंकाळी राहुल यांच्यावर अंत्य विधिची प्रक्रिया पार पाडली जात आहे. मात्र दुसरीकडे इतकी गंभीर दुर्घटना घडल्यानंतर देखील शहरात लोकप्रतिनिधी व प्रशासनामध्ये शांततेचे वातावरण पसरल्याचे दिसून येत आहे.

महापालिका प्रशासनाने धोकादायक झाडांकडे केलेल्या दुर्लक्षपणामुळे ही घटना घडल्यामुळे संबंधित जबाबदार त्यावेळेस अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. मात्र दुसरीकडे याप्रकरणी महापौर डिंपल मेहता, आमदार नरेंद्र मेहता यांनी देखील आपली भूमिका जाहिर केलेली नाही.शुक्रवारी देखील महापालिकेत नियमित प्रमाणे कामकाज सुरु असल्याचे दिसून आले. तर दुसरीकडे पालिकेच्या विरोधी पक्ष नेत्या आफ्रीन सय्यद देखील आपल्या कार्यलयात वरिष्ठ अधिकाऱ्यांचा वाढदिवस साजरा करत होत्या.